नवी दिल्ली :राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना असलेल्या झेड प्लस सुरक्षेत केंद्र सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. पवार यांनी सुरक्षेसंदर्भात काही अटी ठेवल्या आहेत. त्याबाबत दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या अधिकार्यांसोबत शुक्रवारी त्यांची बैठक झाली.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने सुरक्षा वाढवण्याचे कारण मात्र गुप्त ठेवण्यात आले आहे. बैठकीत शरद पवारांनी सुरक्षेसंबंधी काही अटी अधिकार्यांना सांगितल्या. यामध्ये त्यांनी सुरक्षा घराबाहेर द्या, गाडीत सुरक्षारक्षक ठेवण्यासही त्यांनी नकार दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या भिंतीची उंची वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शरद पवारांसोबत 55 सुरक्षा कर्मचारी तीन शिफ्टमध्ये असणार आहेत. त्यासोबतच सुरक्षा दलाकडून दिलेली गाडीच वापरावी, असा आग्रह शरद पवारांना करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीआरपीएफचे महासंचालक कमलेश सिंह, गृहमंत्रालयाचे अधिकारी, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन दल, इंटेलिनजन्स ब्युरोचे प्रतिनिधी बैठकीला हजर होते.