नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला. भागवत यांना अगोदर केंद्र सरकारची झेड प्लस सुरक्षा होती, आता त्यामध्ये वाढ करुन एडवान्स सिक्युरिटी लाइजन (एएसएल) दर्जाची सुरक्षा देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली. (Mohan Bhagwat)
काही राज्यांमध्ये, विशेषत: बिगर-भाजप शासित प्रदेशांमध्ये मोहन भागवतांच्या सुरक्षेमध्ये त्रुटी पाहायला मिळाल्या. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला. तसेच भागवत हे कट्टरपंथी मुस्लीम संघटनांसह अनेक संघटनांच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले जात आहे. बांगलादेश मध्ये सुरू असलेल्या सध्याच्या प्रकारामुळे हा निर्णय घेण्यात आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एएसएल अंतर्गत संरक्षण देणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेशी संबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य आणि या स्तरावरील इतर विभागांचा सहभाग अनिवार्य आहे. यात बहुस्तरीय सुरक्षा घेरासह तोडफोडविरोधी तपासाचा समावेश आहे. हेलिकॉप्टर प्रवासाला केवळ खास डिझाइन केलेल्या हेलिकॉप्टरमध्ये परवानगी दिली जाईल आणि ते ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार चालतील. भागवत यांच्या सुरक्षेवर सुरक्षा यंत्रणांची खास नजर असणार आहे.