नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक करण्यात आली. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने ही नेमणूक केली. यापूर्वी ते भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवांमध्ये रेल्वे बोर्डाचे सदस्य (ट्रॅक्शन आणि रोलिंग स्टॉक) म्हणून कार्यरत होते. ते भारतीय रेल्वे मेकॅनिकल इंजिनिअर्स सर्व्हिसचे १९८६ च्या बॅचचे वरिष्ठ अधिकारी आहेत.
सतीश कुमार मार्च १९८८ मध्ये भारतीय रेल्वेत रुजू झाले आणि त्यांना ३४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. एमटीआरएस रेल्वे बोर्डात रुजू होण्यापूर्वी, त्यांनी उत्तर मध्य रेल्वे, प्रयागराज येथे महाव्यवस्थापक म्हणून काम केले आहे. तसेच कुमार यांनी झाशी विभाग आणि बीएलडब्ल्यू , गोरखपूर, पटियाला लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये काम केले आहे. त्यांनी १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत एकूण गुणवत्ता व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले आणि त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रकल्पांचे पर्यवेक्षण केले.
एप्रिल २०१७ ते एप्रिल २०१९ या कालावधीत त्यांनी उत्तर रेल्वेच्या लखनऊ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) म्हणूनही काम केले आहे. लखनऊमध्ये डीआरएम असताना त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली.