पुढारी ऑनलाईन डेस्क
कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील (Kolkata doctor rape- murder case) आरोपी संजय रॉय याच्या मनोविश्लेषण चाचणीतून धक्कादायक खुलासा समोर आलाय. सदर आरोपीच्या मनोविश्लेषणात्मक चाचणीतून असे संकेत मिळाले आहेत की तो क्रूर प्रवृत्तीचा व्यक्ती असून त्याला पोर्नोग्राफीचे व्यसन होते. त्याने केलेल्या क्रूर कृत्याबद्दल त्याला कसलाही पश्चात्ताप नाही, असे एका केंद्रीय अन्वेषण ब्यूरोच्या अधिकाऱ्याने (CBI) गुरुवारी सांगितले.
कोलकातामधील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेजच्या (RG Kar Medical College and Hospital) सेमिनार विभागात ९ ऑगस्ट रोजी पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी ३१ वर्षीय महिला डॉक्टरचा रक्तबंबाळ अवस्थेतील अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात डाक्टरांनी निदर्शने केली.
या प्रकरणी सीबीआयने १८ ऑगस्ट रोजी केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (CFSL) तज्ज्ञांना कोलकाता घटनेतील आरोपीच्या मनोविश्लेषणात्मक चाचणीचे आदेश दिले होते. ९ ऑगस्ट रोजी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोलकाता पोलिसांचा एक नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला अटक करण्यात आली होती.
सीबीआय अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "त्याला त्याने केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप नाही आणि त्याने प्रत्येक मिनिटाला न थांबता संपूर्ण घटना सांगितली. यावरुन असे दिसून येते की त्याला कोणताही पश्चाताप नाही."
कोलकाता उच्च न्यायालयाने या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यापूर्वी स्थानिक पोलिसांना आरोपीकडून जप्त केलेल्या मोबाईल फोनमध्ये पोर्नोग्राफिक कंटेट सापडला होता. सीबीआय अधिकाऱ्यानेहे देखील अधोरेखित केले की रॉय हा ज्या ठिकाणी गुन्हा घडला तिथे उपस्थित होता. याला तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यातून पुष्टी मिळाली आहे.
हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, रॉय हा ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चेस्ट डिपार्टमेंट वॉर्डजवळ दिसून आला होता. याआधी इंडिया टुडेने यापूर्वी सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रॉय हा ८ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर कोलकाताच्या उत्तर परिसरातील एका 'रेड लाईट एरिया'त गेला होता. तो नशेत होता आणि नंतर त्याने एका महिलेकडे तिचा नग्न फोटो मागितला होता.
"सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो ९ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता पुन्हा त्याच इमारतीत प्रवेश करताना दिसला. काही तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांवरून याची पुष्टी झाली आus," असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.
पीटीआयशी बोलताना अधिकाऱ्याने, आरोपीच्या डीएनए चाचण्यांबद्दल कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान, आरोपीच्या भवानीपूर येथील निवासस्थानीही सीबीआय अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. सीबीआय अधिकाऱ्यांनी तिथे त्यांचे कुटुंबीय, शेजारी आणि कोलकाता पोलिस दलातील त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली होती.