पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि.२५) जळगाव दौऱ्यावर असून यावेळी आयोजित कार्यक्रमात ते ११ लाख लखपती दिदींना प्रमाणपत्र प्रदान करणार आहेत. तसेच त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावेळी २५०० कोटी रुपयांचा एक फिरता निधी - कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड देखील जारी करणार आहेत. यामुळे ४ लाखांहून अधिक बचत गटांना मदत होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी (दि.22) नवी दिल्ली येथे ही माहिती दिली. या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत शिवराज सिंह चव्हाण घेतली. या पत्रकार परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर पेमसानीही उपस्थित होते.
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, जळगाव येथे होत असलेल्या कार्यक्रमातून पंतप्रधान ५ हजार कोटी रुपयांचे बँक कर्जाची रक्कम बचत गटांना देणार आहेत. या कार्यक्रमाला ३४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ३० हजाराहून अधिक ठिकाणचे कार्यक्रमाशी संबंधित घटक आणि लोक व्हर्चुअली जोडले जाणार आहेत. शिवराज सिंह चौहान म्हणाले की, लखपती दिदी म्हणजे त्या महिला आहेत, ज्या वार्षिक एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न कमावतात. या लखपती दिदींनी केवळ आपल्या कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढले नाही तर समाजातील इतरांसाठीही ते आदर्श ठरत आहेत. आम्ही आधीच १ कोटी लखपती दिदी तयार केल्या आहेत. येत्या ३ वर्षांत ३ कोटी लखपती दीदी तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे.