नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : "आता पुरे झाले", अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (दि.२८ ऑगस्ट) दिली. कोलकाता बलात्कार प्रकरणासह देशभरातील महिला अत्याचाराच्या घटनांवर त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली. महिलांवरील गुन्ह्यांच्या "विकृती" बद्दल जागृत होण्याची आणि महिलांना "कमी सामर्थ्यवान, कमी सक्षम, कमी हुशार" म्हणून पाहणाऱ्या मानसिकतेचा प्रतिकार करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील महिला अत्याचार प्रकरणांवर खंत व्यक्त केली.
९ ऑगस्ट रोजीच्या कोलकात्यातील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचा संदर्भ देत, "हताश आणि भयभीत" झाल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. कोणताही सुसंस्कृत समाज मुली आणि बहिणींवर असे अत्याचार होऊ देऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. कोलकात्यात विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत असतानाही गुन्हेगार इतरत्र फिरत राहिले. बदलापूरच्या पीडितांमध्ये अगदी बालवाडीतील मुलींचाही समावेश आहे, असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.
देशातील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर १२ वर्षांत, अशाच स्वरूपाच्या अगणित शोकांतिका घडल्या आहेत; परंतु केवळ काहींनीच देशव्यापी लक्ष वेधले आहे, असे म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चर्चेत न आलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांवर बोट ठेवले. अशा घटनांची समाजाला सामूहिक स्मृतीभ्रंश होतो. त्यानंतर पुन्हा घटना घडल्यावर आम्ही निषेध व्यक्त करतो. अशा सामूहिक स्मृतीभ्रंश हा खेदजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. सामाजिक पूर्वग्रह तसेच काही प्रथांमुळे महिलांच्या अधिकारांच्या विस्ताराला नेहमीच विरोध केला आहे. ही एक अत्यंत खेदजनक मानसिकता असल्याचेही राष्ट्रपतींनी नमूद केले आहे.