पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (दि. ८) सकाळी सुरु झाली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडी ४७ जागांवर तर भारतीय जनता पक्ष २८ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, जम्मू- काश्मीरच्या श्रीगुफ्वारा-बिजबेहारा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या पीडीपी पक्षाच्या सर्वेसर्वा मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती पिछाडीवर पडल्या आहेत. मतमोजणीच्या सातव्या फेऱ्यांनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार बशीर अहमद शाह 3788 मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीदरम्यान इल्तिजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला पराभव मान्य केला आहे.
इल्तिजा मुफ्ती यांनी आपल्या X पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मला लोकांचा निर्णय मान्य आहे. बिजबेहरामधील सर्वांकडून मला मिळालेले प्रेम आणि आपुलकी नेहमीच माझ्यासोबत राहील. माझ्या पीडीपी कार्यकर्त्यांचे कृतज्ञ आहे ज्यांनी या मोहिमेदरम्यान खूप मेहनत घेतली."
जम्मू-काश्मीरमधील श्रीगुफ्वारा-बिजबेहारा हा मतदारसंघातून मुफ्ती कुटुंबाची पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. बिजबेहरा हे अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघांतर्गत येते, जेथे लोकसभा निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांचा पराभव झाला होता.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक मतमोजणीत नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीने आता सत्ता स्थापनेकडे वाटचाल केल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाने सकाळी 10:15 वाजता जाहीर केलेल्या ट्रेंडनुसार राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने ९० पैकी ४७ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप २१ तर अन्य पक्षांनी १७ जागांवर आघाडी घेतली आहे. पीडीपी केवळ 2 जागांवर आघाडीवर आहे.