पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमधील कलम ३७०चा मुद्दा उपस्थित केला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स युती एकच आहेत, असे म्हटलं आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीबाबत भारतातच नाही तर पाकिस्तानातही चर्चा होत आहे. पाकिस्तान जाणीवपूर्वक कलम ३७० वर चर्चा घडवून आणत आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान सांगितले की, "पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स युती एकाच आहे. ही युती कलम 370 आणि 35A च्या पुनर्स्थापनेसाठी काम करू शकते." तसेच जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची युती निवडणूक जिंकून सत्तेत येईल, असा दावाही त्यांनी केला.
नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने निवडणूक प्रचारात कलम जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम पुनर्स्थापित करण्याचे आणि जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या युतीवर निशाणा साधला आहे. भाजपच्या अमित मालवीया यांनी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या विधानाचा चांगलाचा समाचार घेतला आहे. त्यांनी आपल्या X पोस्टमध्ये म्हटलं आहे की, दहशतवादी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानने काश्मीरबाबत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. खलिस्तानी दहशतवादी पन्नूनपासून ते पाकिस्तानपर्यंत राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस नेहमीच भारताच्या हिताशी वैर असलेल्यांच्या बाजूने कशी दिसते?, असा सवालही त्यांनी केला आहे.