पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ॲडॉल्फ हिटलरनंतरचा सर्वात मोठा दहशतवादी आहे. ज्यू नेत्याने पॅलेस्टाईन आणि लेबनॉनला गॅस चेंबर्स बनवले आहे, असा आरोप जम्मू-काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. दरम्यान, इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाहच्या ठार झाल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये निषेध मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरून इस्रायल सरकारच्या विरोधात निदर्शनेही केली होती. तसेच मुफ्ती यांनी रविवारी होणाऱ्या सर्व निवडणूक प्रचार रद्द केल्या होत्या.
'पीटीआय'शी बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नेतन्याहू यांच्या विरोधात निकाल दिला आहे. या (लेबनॉनमधील हल्ल्यांच्या) घटनेने हे सिद्ध झाले आहे की, तो खरोखरच एक गुन्हेगार आहे. त्याने पॅलेस्टाईनमध्ये हजारो लोकांची हत्या केली आहे. आता तेच लेबनॉनमध्येही करत आहे. नेतन्याहू हिटलरनंतरचा सर्वात मोठा दहशतवादी आहे. हिटलरने लोकांना मारण्यासाठी गॅस चेंबर्स उभारले पण नेतन्याहूंनी पॅलेस्टाईन आणि लेबनॉनलाच गॅस चेंबरमध्ये बनवून येथे हजारो लोक मारत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
नेतन्याहू राजवटींशी संबंध ठेवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय चुकीचा आहे. महात्मा गांधींच्या काळापासून आम्ही पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभे आहोत. एका शासनाशी संबंध असणे आणि लोकांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रे आणि ड्रोनचा पुरवठा करणे हा चुकीचा निर्णय आहे," असे त्या म्हणाल्या.