भुवनेश्वर : एकाच वेळी पाच महिलांशी लग्न करून आणखी ४९ महिलांवर जाळे टाकणाऱ्या एका भामट्याला ओडिशा पोलिसांनी जेरबंद केले आहे. हा भामटा ३६ वर्षांचा असून त्याने या महिलांकडून व्यवसायाच्या नावाखाली लाखो रुपये उकळले आहेत.
सत्यजीत समल असे या जयपूरच्या भामट्याचे नाव असून तो या महिलांना आपण पोलिस इन्स्पेक्टर किंवा केंद्र सरकारचा कर्मचारी असल्याचे सांगायचा. त्याने विवाह जुळणी वेबसाईटच्या माध्यमातून विधवा आणि घटस्फोटित महिलांनाच आपले शिकार केले आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून संपर्क करायचा आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करून लग्न करायचे. लग्न झाल्यावर त्या महिलांकडून व्यवसायासाठी रक्कम उकळायची अथवा त्यांच्या नावे कर्ज घ्यायचे असे करून तो पैसे घेऊन पसार होत असे. पैसे मिळाल्यावर तो थेट दुबईला जात असे. वातावरण निवळल्यावर परत येऊन तो नवीन शिकार शोधत असे.
दोन प्रकरणांत तर त्याने तब्बल ५४ लाख रुपये लुबाडून महागडी वाहने खरेदी केली व ती भाड्याने देण्याचा व्यवसायही सुरू केला. ओडिशातील एका महिलेने तक्रार दिल्यावर पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला जयपूरहून अटक केली. त्याने दिलेल्या कबुलीनुसार तो एकाच वेळी पाच महिलांचा पती असून त्या पाचही जणी वेगवेगळ्या शहरातील आहेत. याशिवाय तो देशातील आणखी ४९ महिलांच्या संपर्कात असून त्यांना जाळ्यात पकडण्याची तयारी सुरू होती.