कोलकाता, वृत्तसंस्था : कोलकाता येथील शासकीय रुग्णालयातील (आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय) प्रशिक्षणार्थी डॉक्टर (पीजी, द्वितीय वर्ष) युवतीवर बलात्कारानंतर तिची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. आरोपी संजय याला या प्रकरणात शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी संजयला शुक्रवारी अटक केली होती. तो रुग्णालयीन कर्मचारी नाही; पण रुग्णालयातील विविध विभागांमध्ये त्याचा हस्तक्षेप असतो, असे तपासातून समोर आले आहे. घटनेच्या रात्री डॉक्टर युवतीसह रुग्णालयात असलेल्या 5 अन्य लोकांचीही चौकशी सुरू आहे.
भारतीय न्यायसंहिता कलम 103 (1) नुसार हत्या आणि कलम 64 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त मुरलीधर यांनी सांगितले. गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
शुक्रवारी सेमिनार हॉलमध्ये या डॉक्टर युवतीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली, हे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. युवतीच्या तोंडातून, डोळ्यांतून तसेच गुप्तांगातून रक्त वाहिल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या.
शवविच्छेदन अहवाल अद्याप यायचा आहे. विद्यार्थ्यांनी तीव्र स्वरूपाची निदर्शने केली. डॉक्टर्स असोसिएशननेही 24 तासांत छडा लागला नाही, तर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.