पुढारी ऑनलाईन :
जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात लष्कर आणि दहशतवाद्यांध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले आहे. लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे.
अनेक तासांपासून सुरू असलेल्या चकमकीत सेनेच्या जवानांनी कुपवाडाच्या गुगलधार परिसरात २ दहशतवाद्यांना ठार केले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे दारूगोळ्यासह शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. दरम्यान सैन्याकडून या परिसरात आणखी दहशतवादी असण्याच्या पार्श्वभूमीवर सर्च ऑपरेशन चालवले जात आहे.
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला, असे भारतीय लष्कराने आज (शनिवार) सांगितले. लष्कराच्या श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, भारतीय सैनिकांना गुगलधरमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्या. यानंतर घुसखोरांना आव्हान देण्यात आले आणि गोळीबार सुरू झाला.
गुगलधर भागात अजूनही शोधमोहीम सुरू असल्याचे लष्कराने सांगितले. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त पथकाकडून या मोहिमेचे नेतृत्व केले जात आहे.