

वसंत भोसले
पाटणा : पाटणा जिल्ह्यातील मोकामा विधानसभा मतदारसंघातील जेडीयूचे उमेदवार अनंत सिंह यांना शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. जनसुराज्यचे उमेदवार पीयूष प्रियदर्शी यांचे मामा दुलारचंद यादव यांच्या हत्येचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्यासह आतापर्यंत 83 लोकांना अटक करण्यात आली आहे.
छोटे सरकार विरुद्ध दादा अशा या दोन दोन लोकांची मोकामामध्ये प्रचंड दहशत आहे. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात मारामार्या केल्या जातात. एकमेकांच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. अनंत सिंह यांच्याविरुद्ध आठ खुनाचे तसेच पाच खुनांचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. मोकामा या दोन गँगस्टरच्या मारामार्यांसाठी खूप कुप्रसिद्ध आहे. गेल्या 35 वर्षांत अनंत सिंह विरुद्ध सूरजभान सिंह यांच्यातच निवडणुका होतात. या दोघांनी अनेक वेळा पक्षांतरही केलेली आहेत.
गेल्या 30 ऑक्टोबर रोजी गर्दीतून अनोळखी व्यक्तीने गोळीबार केला, त्यामध्ये पीयूष प्रियदर्शी यांचे मामा दुलावर चंद यादव यांच्या पायात गोळी घुसली. अनंत सिंह यांनीच गोळीबार केल्याने दुलावर चंद यादव यांचा मृत्यू झाला, अशी अफवा सर्वत्र पसरली. मात्र जेव्हा शव विच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांच्या अहवालानुसार दुलावर चंद यांच्या पायात गोळी लागलेली असल्याने त्यांचा मृत्यू झाला नसून, त्यांच्या अंगावरती अनेक जखमा दिसून आल्या. गोळी लागून जखमी झालेल्या यादव यांच्यावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात आले, असे पुढे पोलिस तपासात निष्पन्न झाले. असे पोलिस अधीक्षक कार्तिकीयन शर्मा यांनी सांगितले.
दुलावर चंद यादव हे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांचे ते समर्थक होते; मात्र या निवडणुकीत त्यांचे भाचे प्रियदर्शी यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांचा प्रचार करीत होते. मोकामा विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच तणावाचे वातावरण होते. कारण, अनंत सिंह पुन्हा एकदा निवडणूक निवडणुकीत उतरले होते, तर सूरजभान ऊर्फ दादा त्यांच्या पत्नी वीणादेवी निवडणूक लढवत असल्याने संघर्षाची ठिणगी उडणार असा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये स्थानिक पोलिसांसह केंद्रीय राखीव दल तैनात करण्यात आलेले आहे.