

Rail Neer Prices Drop : केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये मोठी कपात केल्यानंतर त्याचा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किंमती कमी केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय रेल्वेनेही आपल्या प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने 'रेल नीर' या ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांच्या दरात कपात केली आहे. रेल्वे आणि रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या 'रेल नीर'च्या 1 लीटर आणि अर्धा लीटर पाण्याच्या बाटल्यांच्या किमती आता कमी होणार आहेत.
जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने 'रेल नीर'च्या पाण्याच्या बाटल्यांचे कमाल विक्री मूल्य कमी केले आहे. या निर्णयानुसार, यापूर्वी १५ रुपयांना मिळणारी १ लीटर पाण्याची बाटली आता १४ रुपयांना मिळेल. तर अर्धा लीटर पाण्याची बाटली दहा रुपयांऐवजी ९ रुपयांना मिळेल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत परिपत्रकात देण्यात आली आहे.
'रेल नीर' हे भारतीय रेल्वेची उपकंपनी आईआरसीटीसी (IRCTC) च्या मालकीचा ब्रँड आहे. आयआरसीटीसी ही देशातील रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये पाणी विकते. इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या २० रुपयांना विक्री होते. तर आयआरसीटीसीच्या पाण्याच्या बाटलीची किंमत १५ रुपये होती. कंपनीने फक्त 'रेल नीर'च्या विक्रीतून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये केवळ '46.13 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.
3 सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेने जीएसटीचे चार स्लॅब रद्द करून फक्त दोन स्लॅब कायम ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानुसार 22 सप्टेंबरपासून 12% आणि 28% हे स्लॅब हटवले जातील आणि केवळ 5% आणि 18% हे स्लॅब लागू राहतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे की या जीएसटी कपातीचा थेट फायदा सर्वसामान्यांना मिळेल. जर कोणी या कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास टाळाटाळ केली, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.