India@75 : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अमरावतीचे योगदान | पुढारी

India@75 : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अमरावतीचे योगदान

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अमरावतीचा मोठा सहभाग राहिला आहे. इ. स. १८४५ पासूनच स्वातंत्र्य समराची सुरुवात अमरावतीत झाली होती. तेव्हापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत अमरावतीमधील अनेक क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी योगदान दिले आहे.

१८९७ ची ‘उमरावती काँग्रेस’

देशातील दुर्धर दुष्काळ, वऱ्हाड-महाराष्ट्रात उद्भवलेली प्लेगच्या तापाची साथ, बंगाल प्रांतात झालेला भूकंप व भयंकर वादळाने तेथील जनतेची उडालेली धूळधाण आणि नुकसान, पुण्यातील प्लेगच्या साथीच्या प्रकरणातून राणीच्या जुबली महोत्सवाच्या रात्री झालेला रँड व आयर्स्ट यांचा खून व त्या खुनाच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या चाफेकरांवरील सुरू असलेला खटला, याच प्रकरणी संशयावरून पकडण्यात आलेल्या नातू बंधूचा छळ, त्यांच्या मालमत्तेची जप्ती आणि या खुनाच्या प्रकरणी लोकमान्य टिळकांना अडकवण्याचे न साध्य झाल्याने केसरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखाच्या आरोपाखाली सरकारने त्यांना केलेली अटक अशा अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर २७, २८ व २९ डिसेंबर १८९७ रोजी उमरावती येथे ऑल इंडिया काँग्रेसचे तेरावे अधिवेशन मद्रासचे सी. शंकरन नायर यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आले होते. अमरावतीत त्याकाळी मोरोपंत जोशी, रंगनाथपंत मुधोळकर, दादासाहेब खापर्डे हे नेते काँग्रेसचे कार्यकर्ते होते.

चाफेकर यांचे बंधू अमरावतीत

१८९७ च्या जून महिन्यात पुण्याला प्लेगच्या साथीच्या काळात प्लेग नियंत्रण अधिकारी रँड या इंग्रज अधिकाऱ्याच्या खून प्रकरणी फाशी झालेले दामोदर चाफेकर यांचा एक भाऊ व वडील हरिभाऊ कीर्तनकार हे अमरावतीला काही काळ राहिले होते.

महात्मा गांधींचे अमरावतीत वास्तव्य

१९ मार्च १९२१ रोजी नागपूर मेलने महात्मा गांधी यांचे अमरावतीत आगमन झाले होते. वाटेत वेगवेगळ्या स्टेशनवर त्यांचे स्वागत झाले. माणगाव स्टेशनवर लोकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला होता. मेल बडनेरा स्टेशनवर आली. तेव्हा मोठी गर्दी झाली होती. अमरावतीला तिलक कॅम्पवरील शिवनाथ बापू यांच्या बंगल्यावर त्यांची उतरण्याची व्यवस्था केली होती. शहरापासून हा बंगला दोन मैल असल्याने लोकांची रस्त्याच्या दुतर्फावर गर्दी होती. महात्मा गांधी यांचे रात्री आठ वाजता येथील शिवाजी चौकात व्याख्यान झाले होते.

वीर वामनराव जोशी यांना अटक

अमरावतीचे पुढारी व ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सभासद वीर वामनराव गोपाळ जोशी हे बेसवाडा येथे भरणाऱ्या कमिटीच्या बैठकीस हजर राहण्यासाठी जात होते. त्यांना यावलखेड येथे २८ मार्च १९२१ रोजी मध्यरात्री रेल्वे गाडीतच कैद करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अटकेची बातमी सर्व शहरभर पसरली आणि शहरात स्वयंपूर्ण हरताळ झाला. वीर वामनराव जोशी यांच्यावर अकोला कोर्टात खटला चालून ९ मे १९२१ रोजी राजद्रोही भाषण केल्याच्या आरोपावरून २८ महिने मजुरीची शिक्षा सुनावली होती.

पंडित मोतीलाल नेहरू आले होते अमरावतीत

स्वराज्य पक्षाचे पंडित मोतीलाल नेहरू हे १२ नोव्हेंबर १८२५ रोजी अमरावतीत आले होते. बॅरिस्टर रामराव देशमुख, बाबासाहेब खापर्डे आणि दादासाहेब शेवडे हे मोतीलाल यांना आणण्यासाठी बटनेरा स्टेशनवर गेले होते. अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवरही बरेच नागरिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवक त्यांच्या स्वागतार्थ हजर होते. गाडीतून उतरताच मोतीलाल नेहरू यांचे हारतुरे खालून स्वागत करण्यात आले. सायंकाळी गणेश नाटकगृहात त्यांचे व्याख्यान होते.

इंग्रजांकडून लाठीमार

पुसद सत्याग्रह पाहून परत आल्यानंतर १२ जुलै रोजी वराड प्रांत युद्ध मंडळाचे एक प्रमुख सभासद डॉ. पटवर्धन व डॉ. सोमण यांना अमरावती मुक्कामी १०८ कलमाखाली पकडण्यात आले. त्यांच्या अटकेचा निषेध करीत हजारो लोकांची मिरवणूक पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आली. त्यांच्या आग्रहास्तव डॉ. सोमण व डॉ. पटवर्धन चार शब्द बोलणार इतक्यात इंग्रजांनी भरधाव घोडे घेऊन जमावावर चाल केली. काही स्त्रियांना व पुरुषांना घोड्यांच्या टापा लागल्या. त्यामुळे लोकांनी चिडून या ऑफिसरवर दगडफेक सुरू केली. त्यावरून चिडून त्या अधिकाऱ्यांनी शस्त्रे, लोकांवर लाठीमार करण्याचा हुकूम जारी केला. यात काही लोक जखमी झाले होते.

Back to top button