…तर एकविसावे शतक भारताचेच! | पुढारी

...तर एकविसावे शतक भारताचेच!

नितीन गडकरी, 

केंद्रीय मंत्री, भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जाणारा आपला भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. गेल्या काही वर्षांत राष्ट्रासह जागतिक स्तरावर आपण बजावलेल्या कामगिरीमुळे भारताकडे ‘वर्ल्ड लीडर’ म्हणून पाहिले जात आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश. आपल्याकडे साधन-संसाधनांची कमतरता नाही. बुद्धिमत्तेची वाण नाही. तरीही या देशाला गरीब लोकांचा श्रीमंत देश म्हणून ओळखले जायचे. त्यासाठी स्वातंत्र्यानंतरच्या काळातील काँग्रेसचे सातत्याने सत्तेत असलेले सरकार बव्हंशी जबाबदार होते. भ्रष्टाचार, भाई-भतिजावाद, धोरणात्मक द़ृष्टिकोनाचा अभाव अशी अनेक कारणे त्यामागे होती. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून सात वर्षांच्या काळात भारताने कात टाकली आहे आणि त्याच्याकडे सारे जग कुतूहलाने पाहते आहे.

गेल्या काही वर्षांत उद्योग, कृषी आणि पायाभूत सुविधेसह प्रत्येक क्षेत्रात देशाचा विकास झालेला दिसून येतो. याच बदलाच्या मार्गावरून देश हळूहळू जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे बरेच मोठे व सकारात्मक बदल सर्व क्षेत्रांत दिसून आले आहेत. गंगेतून जलमार्ग बनू शकतो, यावर अगोदर लोकांना विश्वास बसला नव्हता. परंतु, आम्ही वाराणसी ते हल्दीया जलमार्ग प्रत्यक्षात आणला. ब्रह्मपुत्रा जलमार्ग बनवला. बांगला देशातील मुंगली पोर्टपर्यंत जलमार्ग बनवण्यात येत आहे. परिवहनाचे एक स्वस्त आणि एकूणच वाहतुकीचा खर्च कमी करणारे हे नवीन माध्यम देशात रुजू लागले आहे. याशिवाय, देशातील अनेक छोट्या-मोठ्या विमानतळांना कार्यान्वित करण्यात आले आहे. ‘उडाण’ योजनेमुळे हे सर्व शक्य झाले आहे.

आपण काम करीत राहिलो, तर आपल्याला समर्थन देणार्‍यांची कमी भासत नाही आणि कामांचा प्रचार करण्याची आवश्यकताही पडत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे माझ्यावर विशेष प्रेम होते. एकदा बाळासाहेबांनी मला बोलावून घेतले आणि एक सुंदर ओळी असलेली पाटी भेट दिली. ‘आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्ज डन.’ अशी सुंदर ओळ त्यावर लिहिली होती. महाराष्ट्रात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, 55 उड्डाणपूल, वांद्रे-वरळी सी लिंक बनवण्याच्या कार्यात मोठे योगदान देण्याचे भाग्य मला लाभले. आपण काम करीत राहिले पाहिजे, या सिद्धांताचे हे यश होते व आजही ते मी अनुभवतो आहे. काम केले तर लोक निश्चितच त्याची दखल घेतात, सन्मान देतात आणि पाठबळही देतात. हीच बाब वर्तमान केंद्र सरकारच्या बाबतीत खरी ठरते आहे. सकारात्मक द़ृष्टीसह आत्मविश्वासाने भविष्याचा वेध घेतला तर निश्चित यश मिळते. भारतात सर्व क्षेत्रांमध्ये झालेले परिवर्तन हे त्याचे जिवंत उदाहरण म्हणता येईल.

भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयात गेल्या आठ वर्षांत 50 लाख कोटींची कामे झाली आहेत. काही प्रमाणात सरकारच्या निधीतून, तर काही कामे बाहेरून पैसा उभा करून केली गेली. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी मला बोलावून घेतले होते. ‘रस्ते, पूल बरेच बनवले. आता गावांना जोडणार्‍या रस्त्यांची योजना बनवा.’ अशा शब्दांत त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यातून ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजना’ माझ्या अध्यक्षतेखालील समितीने बनवली. आजही ही योजना देशाची फ्लॅगशिप योजना आहे. देशातील साडेसहा लाख गावांपैकी जवळपास साडेचार लाख गावांना जोडणारे मजबूत रस्ते आतापर्यंत बनवण्यात आले आहेत. बीओटी तत्त्वावर उभारण्यात आलेला देशातील पहिला राष्ट्रीय महामार्ग ठाणे-भिवंडी बायपास बनवण्याचे भाग्य मला लाभले. 2024 अखेरपर्यंत देशातील रोड इन्फ्रास्ट्रक्चर अमेरिकेच्या बरोबरीचे असेल, याचा मला विश्वास वाटतो. या विकासाला तंत्रज्ञानाची जोड दिली तर त्याची उपयोगिता अधिक वाढते. मला हे येथे आवर्जून सांगितले पाहिजे की, देशात आता 97 टक्के फास्टॅग लागू झाले आहे. याहून पुढचे तंत्रज्ञान आम्ही वापरणार आहोत. उपग्रहाच्या माध्यमातून टोल आकारणीच्या अनुषंगाने प्रयत्न केले जात आहेत.

देशात अडीच लाख कोटी खर्च करून 285 किलोमीटर लांबीचे बोगदे बनवले जात आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच 12 हजार कोटींच्या किमतीचे बोगदे पाच हजार कोटी रुपयांत बनवण्याचा विक्रम आम्ही करीत आहोत. रस्ते बांधकामातील खर्च कमी करण्यासाठी आमच्यासमोर ‘ग्लास फायबर स्टील’ चा पर्याय आहे. इमारत बांधकामामध्येही याचा वापर केला तर खर्च कमी होईल. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याला आमचे प्राधान्य आहे.

सामरिकद़ृष्ट्या महत्त्वाची कामे

सामरिकद़ृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी जोझिला बोगद्यावर वेगाने काम सुरू आहे. या कार्यस्थळी एक हजार कामगार उणे 6 आणि उणे 8 अंश सेल्सिअस एवढ्या थंड वातावरणात कार्यरत आहेत. इच्छाशक्ती असेल तर सारे काही होऊ शकते. तीव्र राजकीय इच्छाशक्ती ही आमच्या सरकारची ताकद आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा 14 किलोमीटर लांबीचा बोगदा कारगिलमध्ये उभारला जात आहे. रोहतांग पासपासून चार बोगदे बनवले जात आहेत. सामरिकद़ृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या लेह-लडाखपर्यंत हे बोगदे पोहोचतील. लडाख-लेहपासून कारगिलपर्यंत जोझिला बोगदा बनत आहे. जोझिलानंतर झेड मोड बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. श्रीनगरवरून जम्मूला जाताना कटराच्या अगोदरच मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे लागेल. येथून सहा तासांमध्ये दिल्लीला पोहोचता येईल. दिल्लीवरून 12 तासांत मुंबईला पोहोचता येईल. मुंबईच्या मार्गात सुरतवरून चेन्नई, बंगळूर आणि कन्याकुमारीच्या दिशेनेदेखील जाता येईल. उत्तरेपासून दक्षिण भारतापर्यंत चांगलेच रस्ते दिसून येतील.

रस्त्यांची विश्वविक्रमी बांधकामे

2022 मध्ये रस्ते बांधकाम क्षेत्रात परिवहन मंत्रालयाने पाच विश्वविक्रम केले आहेत. केवळ 105 तास 33 मिनिटांमध्ये 75 किलोमीटर लांब राजमार्ग बांधण्यात आला असून; याचे श्रेय अहोरात्र मेहनत करणारे श्रमिक, अभियंते, सल्लागार व कंत्राटदारांचे आहे. राष्ट्रीय महामार्ग 53 वर अमरावती तसेच अकोलादरम्यान हा एकल ‘बिटूमिन्स काँक्रीट’ रस्ता बांधण्यात आला. यासंदर्भात एक मुद्दा येथे सांगितला पाहिजे. तो असा की, राईस स्ट्रॉपासून इथेनॉल तयार करण्यासाठी इंडियन ऑईल एक प्लांट टाकणार आहे. त्यातून एक लाख लिटर इथेनॉल आणि दीडशे टन बायो बिटूमिन्स दररोज तयार होईल. 75 लाख टन बिटूमिन आपल्याला लागते. 50 लाख टन आपल्या देशात उपलब्ध आहे. 25 लाख टन आपण आयात करतो. हे बिटूमिन्स आपल्या देशात तयार झाले तर पर्‍हाटी जाळावी लागणार नाही. बिटूमिन्सदेखील मिळेल. आयातीचा पर्याय तयार होईल. हा पर्याय स्वस्त, प्रदूषणमुक्त आहे. जी पर्‍हाटी जाळली जाते, तिचा पैसा शेतकर्‍यांना मिळेल. शेतकर्‍यांचा फायदा होईल. असे पर्याय आपल्याला शोधावे लागतील आणि त्यावर अंमलही करावा लागेल.

ऊर्जा आत्मनिर्भरता

आत्मनिर्भर भारताच्या संदर्भात ऊर्जा आत्मनिर्भरता हा फार महत्त्वाचा भाग आहे. सौर ऊर्जा, जलविद्युत या पर्यायांचा मोठ्या प्रमाणात वापर होणे आवश्यक आहे. आपण आता थोरियमवर आधारित ऊर्जेचा विचार करतो आहोत. शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे की, जेवढी ऊर्जा साडेतीन हजार टन कोळसा जाळल्यावर मिळते, तेवढी केवळ एक किलो थोरियममधून मिळू शकते. आपल्याकडे थोरियम आहे. त्यावर पुढची प्रक्रिया करणे आणि ऊर्जा मिळवणे यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. याशिवाय, प्रदूषणरहित औष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी तंत्रज्ञान आणणार आहोत. फ्लाय अ‍ॅशचा वापर अनेक गोष्टींसाठी करता येतो. सिमेंटमध्ये 35 टक्के फ्लाय अ‍ॅश वापरली जाऊ शकते. विजेवर चालणारी वाहने, इथेनॉल व अन्य बायो फ्यूएलवरची वाहने, ग्रीन हायड्रोजन यांच्या वापराच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांना यशदेखील मिळते आहे.

पेट्रोल-डिझेलपासून मुक्ततेसाठी जास्तीत जास्त इथेनॉल, मिथेनॉल, इलेक्ट्रिक, बायोफ्यूएल, ग्रीन हायड्रोजन, बायो सीएनजीचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. देशातील शेतकरी ‘अन्नदाता’ आहेच. त्याने ‘ऊर्जादाता’ही व्हावे, हे आमचे व्हिजन आहे. इथेनॉलची ‘कॅलरीक व्हॅल्यू’ कमी आहे. परंतु, ही व्हॅल्यू पेट्रोलएवढी होऊ शकते, हे आपल्या संशोधकांनी अभ्यासातून सिद्ध केले आहे. यातून देशाचे 15 ते 20 हजार कोटी वाचतील. देशातील इंधनाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तसेच देश ऊर्जा निर्यातदार बनवण्यासाठी उसापासून इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

दुचाकी आणि तीनचाकी आता मोठ्या प्रमाणात फ्लेक्स इंजिनवर आल्या आहेत. प्रदूषणाचे धोके त्यामुळे कमी होतील. तांदूळ, कचरा, मका, फूड ग्रेन, बायोमासपासून इथेनॉल बनवले तर आता पेट्रोल-डिझेलच्या आयातीवर होणारा 10 लाख कोटींचा खर्च वाचेल. या इंधनापेक्षा प्रदूषणमुक्त हरित इंधन चांगले आहे. शेतकरी आता धान्य तसेच उसाच्या मदतीने बायो इथेनॉल बनवत आहेत. सरकार ग्रीन हायड्रोजन तसेच क्लीन एनर्जीच्या वापरावर अधिक लक्ष केंद्रित करीत आहे. येत्या पाच वर्षांत देशातील वाहन उद्योग 15 हजार कोटींचा होईल. राज्य आणि केंद्र सरकारला सर्वाधिक जीएसटी आणि सर्वाधिक रोजगार देणारा हा उद्योग आहे. जवळपास साडेचार कोटी रोजगार वाहन उद्योगामुळे मिळतो. येत्या पाच वर्षांत दोन कोटी अतिरिक्त रोजगार मिळतील.

सर्व इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती येत्या वर्षभरात पेट्रोलच्या वाहनांएवढ्या होतील. केंद्र सरकार पेट्रोल तसेच डिझेलऐवजी पिकांच्या अवशेषातून उत्पादित इथेनॉलला प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अगोदरपासूनच मोठ्या प्रमाणात हरित इंधनाला सरकार प्रोत्साहन देत आहे. जगातील सर्वश्रेष्ठ इलेक्ट्रिक कार उत्पादनाची क्षमता भारतीय कार उत्पादकांमध्ये आहे. देशात विविध प्रकारचे ऑटोमोबाईल ब्रँडस् आहेत. कंपन्यांना त्यांची कार भारतात विक्री करायची असेल, तर त्यांचे उत्पादन त्यांना भारतातच करावे लागेल, अशी आमची भूमिका आहे. देशातील उत्पादक जगातील इतर वाहन उत्पादकांच्या तुलनेत चांगली वाहने बनवू शकतात. 30 मार्च 2022 रोजी ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणार्‍या कारने मी संसदेत पोहोचलो होतो. टोयोटा मिराई कारला एका पथदर्शी प्रकल्पानुसार तयार करण्यात आले आहे.

यात एक अ‍ॅडव्हॉन्स फ्यूएल सेल सिस्टम लावण्यात आली आहे. ही सिस्टम सेल ऑक्सिजन तसेच हायड्रोजन यांचे मिश्रण करून एका खास प्रक्रियेनुसार ऊर्जेची निर्मिती करते. याच विजेच्या आधारे कार धावते. ही कार पर्यावरणस्नेही आहे. या कारमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण पसरत नाही. ही आणि अशा कार्स वापरणे हे देशाच्या भविष्यासाठी इष्ट आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांनी येत्या सहा महिन्यांच्या आत फ्लेक्स फ्यूएल व्हेईकलचे उत्पादन सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पूर्णत: स्वच्छ ऊर्जेवर ही योजना घेऊन जाईल. टीव्हीएस मोटार आणि बजाज ऑटोसारख्या दुचाकी तसेच तीन चाकी वाहनांसाठी अगोदरपासूनच फ्लेक्स फ्यूएल इंजिनचे निर्माण सुरू केले आहे.

‘अमेरिका श्रीमंत देश असल्यामुळे अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत, असे नसून, अमेरिकेतील रस्ते चांगले असल्याने अमेरिका श्रीमंत आहे’, असे अमेरिकेचे पस्तिसावे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी म्हणायचे. केनेडी यांचे हे वाक्य मी नेहमी ध्यानात ठेवतो. भारतातील रस्त्यांचे जाळे आणि पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीचे करण्याचे ध्येय आमच्यापुढे आहे. 2024 च्या शेवटपर्यंत भारतातील रस्ते आणि वाहतुकीच्या अन्य पायाभूत सुविधा अमेरिकेएवढ्याच प्रगत असतील. कमी खर्चात चांगल्या गुणवत्तेचे रस्ते बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. 18 वे शतक मोगलांचे होते, 19 वे शतक इंग्रजांचे होते, तर 20 व्या शतकात अमेरिका जागतिक महाशक्ती होती. आता आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीसाठी काम केले तर 21 वे शतक भारताचे असेल! याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

Back to top button