नागपूर-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’या अभियानांतर्गत मनपातर्फे 'तिरंगा मॅरेथॉन' " चे आयोजन करण्यात आले. ३०० हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. सेंट उर्सुला शाळेपासून प्रारंभ झालेल्या मॅरेथॉनला मनपाचे उपायुक्त प्रकाश वराडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. या प्रसंगी मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त प्रमोद वानखेडे, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तसेच विविध क्रीडा संघटनेचे खेळाडू प्रामुख्याने उपस्थित होते.
‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आपले राष्ट्र आणि राष्ट्रध्वजाप्रती नागरिकांच्या मनात आदर आणि देशभक्तीची भावना वृदिंगत व्हावी हे या विविध उपक्रमांचे उदिष्ट असून,नागरिकांनी देखील या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन मिलिंद मेश्राम यांनी यावेळी केली.ही मॅरेथॉन व्हीसीए चौक, रवी भवन चौक, प्रधान डाक घर (जीपीओ) चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासामोरून सेंट उर्सुला शाळा येथे सांगता झाली.