बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्यदिनानिमित्त दि. १५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिन कार्यक्रम नेटकेपणाने साजरा करण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी व उपसमित्यांनी तयारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केल्या. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय सण असून जिल्हा मैदानावर हा सण साजरा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तयारीला लागावे. शहरातील महत्त्वाचे चौक सुशोभित करावेत. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका वेळेत छापून ती मान्यवरांपर्यंत पोहोचवावी.
शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिरात १५ रोजी सायंकाळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन व्यवस्थित करावे. स्वातंत्र्यदिनाच्या तयारीसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून सर्व समित्यांनी समन्वयाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली.
बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी, दलित संघटनेचे नेते श्रीनिवास ताळूरकर, मल्लेश चौगुले, विकास कलघटगी, स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी, यल्लाप्पा हुदली, बसवराज हट्टीगौडा यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.