गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, मृतांची संख्या ८ वर, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

Floods in Gujarat | १७०० लोकांना पुरातून सुरक्षित बाहेर काढले
Floods in Gujarat
गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, संबंधित घटनांमध्ये ८ जणांचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: मागील २ ते ३ दिवसांपासून गुजरातमधील पावसाने हाहाकार उडवला आहे. दरम्यान पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे १७०० लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. तर २३८७१ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे राज्य सरकारकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, गुजरातवर कमी दाबाचे क्षेत्र तीव्र आहे. त्यामुळे आणखी पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने २९ ऑगस्टपर्यंत राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात जोरदार वारे वाहतील आणि मुसळधार पाऊसही पडेल, असे विभागाने म्हटले आहे. ताज्या बुलेटिनमध्ये, IMD ने म्हटले आहे की, गुजरात प्रदेशातील कमी दाबामुळे निर्माण झालेली वादळी प्रणाली हळूहळू पश्चिम-नैऋत्य दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे गुरूवार २९ ऑगस्टच्या सकाळपर्यंत ते सौराष्ट्र, कच्छ किनारपट्टी आणि पाकिस्तान आणि ईशान्य अरबी समुद्राच्या लगतच्या भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मागील २ दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना मंगळवारी (२७ ऑगस्ट २०२४) सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेने जवळपास 30 गाड्या रद्द केल्या आहेत. भारतीय हवामान खात्याने (IMD) गुजरातमधील अनेक जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ चेतावणी जारी केली होती आणि काही दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला होता. IMD रेड अलर्ट दिलेल्यांमध्ये संपूर्ण सौराष्ट्र प्रदेश, कच्छ, खेडा, आणंद, पंचमहाल, दाहोद, तापी, नवसारी आणि वलसाड हे जिल्हे आहेत.

गुजरातच्या विविध भागात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शहरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यभरात पावसामुळे आठ जणांना जीव गमवावा लागला आहे, तर सुमारे सहा हजार लोकांना इतर ठिकाणी आसरा घ्यावा लागला आहे. अधिका-यांनी सांगितले की, मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आणि सखल भागात पूर आला. सततच्या पावसामुळे धरणांच्या आणि नद्यांच्या पाणी पातळीत झालेली वाढ पाहता सहा हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीनगर, खेडा आणि वडोदरा जिल्ह्यात भिंत कोसळण्याच्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला, तर आनंद जिल्ह्यात झाडे पडल्याने एकाचा मृत्यू झाला आणि पावसाच्या पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला. पंचमहाल, नवसारी, वलसाड, वडोदरा, भरूच, खेडा, गांधीनगर, बोटाड आणि अरवली जिल्ह्यांतील प्रशासनाने नद्या आणि धरणांमधील पाण्याची पातळी वाढल्याने आणि सखल भागात पूर आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news