चेन्नई: वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) ऐतिहासिक कर कपातीमुळे अर्थव्यवस्थेत दोन लाख कोटी रुपयांची भर पडेल. या कर कपातीचा फायदा उत्पादक ग्राहकांना देऊ करतील, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.
ट्रेड अँड इंडस्ट्रीज असोसिएशन, टॅक्स रिफॉर्म फॉर रायझिंग भारतच्या वतीने चेन्नई येथे रविवारी आयोजित परिषदेत त्या बोलत होत्या. जीएसटी कौन्सिलने 12 आणि 5 या प्रमुख कर श्रेणीवर शिक्कामोर्तब केले, तर तंबाखूसारखे हानीकारक पदार्थ आणि लक्झरी वस्तूंवर 40 टक्क्यांची नवी कर श्रेणी जाहीर केली आहे. नवीन कर येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
नवीन कर श्रेणीमुळे पूर्वीच्या 12 टक्क्यांमधील 99 टक्के वस्तू या पाच टक्के कर श्रेणीत आल्या आहेत. दैनंदिन वापराच्या वस्तूंसह पाकीटबंद खाद्यान्न, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने अशा विविध वस्तूंच्या दरात घट होणार आहे. सीतारामन म्हणाल्या, कर कपातीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे वस्तूंच्या घटणार्या किमतीचा फायदा अंतिम ग्राहकांना मिळेल, याचे आश्वासन कंपन्यांनी दिले आहे. व्यापारी आणि औद्योगिक संघटना देखील अंतिम घटकाला फायदा मिळवून देण्यासाठी काम करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार जीएसटी दरांमध्ये सुसूत्रता आणण्यात आली आहे. त्यासाठी जवळपास आठ महिने काम सुरू होते. ग्राहकांसाठी दिवाळी बोनस देण्यासाठी आम्ही योजना आखत होतो. ग्राहकांना सणासुदीची खरेदी करणे सोयीची जावी, असा त्यामागे हेतू असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.