"तो एका माफियासारखाच..."

डाॅक्‍टर बलात्‍कार-हत्‍या प्रकरण : माजी प्राचार्यांवर माजी सहकार्‍याचे गंभीर आरोप
RG Kar Medical College and Hospital rape-murder case
Representative image
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्‍या प्राचार्यांच्‍या गेस्ट हाऊसवर संदीप घोष हा विद्यार्थ्यांना दारू पुरवत असे. त्‍यानेच विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी होण्यासही सांगितले. तो एका माफियासारखा आहे. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत इतका वाईट माणूस पाहिला नाही," अशा शब्‍दांमध्‍ये कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्‍या माजी प्राचार्य संदीप घोष यांचे वर्णन कॉलेजचे माजी उपअधीक्षक अख्‍तर अली यांनी केले आहे. ANI वृत्तसंस्‍थेशी बोलताना अख्‍तर अली यांनी संदीप घोष यांच्‍याबाबत अनेक धक्‍कादायक दावे केले आहेत.

कोलकाता आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्‍या पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर महिलेवर झालेला बलात्‍कार आणि निर्घृण हत्‍येने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील सरकारी रुग्‍णातील डॉक्टर रस्‍त्‍यावर उतरले आहेत. फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशने कोलकातामधील आरजी कार रुग्णालयाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्‍यान, या प्रकरणी आरजी कार मेडिकल कॉलेजचे प्राचार्य संदीप घोष यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला. मात्र त्‍यानंतर केवळ ८ तासांमध्‍ये ममता बॅनर्जी सरकारने त्‍यांची नियुक्‍ती कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेजचे प्राचार्य म्‍हणून केली. यानंतर त्‍यांच्‍या वर्तनावर आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी उपअधीक्षक अख्‍तर अली यांनी अनेक धक्‍कादायक दावे केले.

मी माझ्या कारकिर्दीत इतका वाईट माणूस पाहिला नाही...

अख्तर अली म्‍हणाले, "संदीप घोष हा एक अतिशय भ्रष्ट व्यक्ती आहे. तो विद्यार्थ्यांना नापास करत असे. तसेच हॉस्पिटलच्‍या प्रत्‍येक निविदा ऑर्डरवर २० टक्के कमिशन देखील मिळवत असे. ताे आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या प्रत्येक कामातून पैसे लुटायचा. ताे त्याच्या गेस्ट हाऊसमध्ये विद्यार्थ्यांना दारू पुरवायचा. त्‍याच्‍या सांगण्‍यावरुन काही विद्यार्थी निषेधांमध्ये सहभागी झाले होते. तो एका माफिया व्यक्तीसारखा आहे. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत इतका वाईट माणूस पाहिला नाही,"

संदीप घोषविरोधात केली होती तक्रार दाखल : अख्तर अली

अख्तर अली यांनी म्‍हटलं आहे की, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य असताना संदीप घोष याच्याकडे स्‍वत:ची मोठी सुरक्षा होती. त्‍याने केवळ स्‍वत:च्‍या सुरक्षेसाठी २० कर्मचारी आणि ४ बाउन्सर ठेवले होते. आम्ही एवढी सुरक्षा केवळ चित्रपट कलाकारांकडेच पाहिली हाेती. मी 2023 मध्ये त्याच्याविरुद्ध तक्रारही केली होती. आता संदीप घोष याचा राजीनामा हा एक धूळफेक आहे. राजीनामा दिल्‍यानंतर आठ तासांमध्‍ये त्‍याला काेलकात्ता नॅशनल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (CNMCH) चे प्राचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, याकडेही अख्तर अली यांनी लक्ष वेधले.

उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर तपास सीबीआयकडे

आरजी कार मेडिकल कॉलेजच्‍या सेमिनार विभागात शुक्रवार, ९ ऑगस्‍ट रोजी पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी ३१ वर्षीय महिला डॉक्‍टरचा रक्तबंबाळ अवस्थेतील अर्धनग्न मृतदेह आढळला. या घटनेने एकच खळबळ उडाली. हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टर आक्रमक झाले. अखेर संदीप घोष यांनी प्राचार्यपदाचा राजीनामा देणे भाग पडले. दरम्‍यान, महिला डॉक्‍टर बलात्‍कार आणि हत्‍या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्‍वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्‍यात यावा, असा आदेश कोलकाता उच्‍च न्‍यायालयाने मंगळवारी दिला. या प्रकरणाचा तपास सीबीआयने तपास हाती घेतला आहे. आराेपी व हॉस्‍टिटलमधील नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला ताब्‍यात घेतले आहे. सर्व कागदपत्रेही कोलकाता पोलिसांकडून सीबीआयने आपल्‍या ताब्‍यात घेतली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news