

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एअर विंगमध्ये पहिल्यांदाच एका महिलेने फ्लाईट इंजिनिअर म्हणून इतिहास रचला आहे. इन्स्पेक्टर भावना चौधरी यांनी बीएसएफच्या अंतर्गत दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. त्यांच्यासह चार पुरुष अधिकार्यांनाही बीएसएफचे महासंचालक दलजीतसिंह चौधरी यांच्या हस्ते फ्लाईंग बॅज प्रदान करण्यात आले.
पाच अधिकारी, ज्यात इन्स्पेक्टर भावना चौधरी यांचा समावेश होता, यांना बीएसएफच्या एअर विंगच्या प्रशिक्षकांकडून अब-इनिशिओ पद्धतीने म्हणजे सुरुवातीपासून प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण ऑगस्टपासून सुरू होऊन दोन महिन्यांचे होते आणि यामध्ये 130 तासांचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. या कालावधीत त्यांनी प्रत्यक्ष उड्डाण मोहिमा, विशेषतः पंजाब व अन्य राज्यांतील पुराच्या काळात अनुभवल्या.