पुढारी ऑनलाइन डेस्क : सरकारच्या गोपनीय माहितीला धोका निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट करत कर्मचार्यांनी 'चॅटजीपीटी', 'डीपसीक'सारखी AI ॲपचा वापर करणे टाळावे, अशी सूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर्मचार्यांना केली असल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने २९ जानेवारी रोजी कर्मचार्यांसाठी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की, कार्यालयीन संगणक आणि मोबाईलमध्ये ChatGPT, DeepSeek अशा प्रकराच्या AI ॲपचा वापर करु नका. अशा प्रकारचे ॲप हे सरकारची महत्त्वपूर्ण आणि गोपनीय माहिती उघड होण्याचा धोका असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे चॅटजीपीटी आणि डीपसीक सारख्या एआय टूल्सचा वापर टाळावा. अशा प्रकराच्या चॅटबॉट्समुळे सरकारी कागदपत्रे आणि डेटाच्या गोपनीयतेला धोका निर्माण होतो, असेही 'रॉयटर्स'ने अंतर्गत विभागाच्या सल्लागाराचा हवाला देत म्हटले आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाची ही अधिसूचना २९ जानेवारी जारी केली आहे. मात्र तब्बल एक आवठड्यानंतर ही सूचना चर्चेत येण्यास OpenAIचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्या भारत दौऱ्याशी याचा संबंध जोडला जात आहे. ऑल्टमन हे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्याची अपेक्षा आहे.
चीनचे अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या डीपसीकवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या स्वतःच्या पायाभूत मॉडेलसह जागतिक एआय स्पर्धेत उतरणार असल्याचे सूतोवाच केले होते. भारतात बनवलेले फाउंडेशनल मॉडेल्स जगातील सर्वोत्तम मॉडेल्सशी स्पर्धा करू शकतील.अल्गोरिथमिक कार्यक्षमतेसह आपण हे मॉडेल्स खूपच कमी वेळेत तयार करू शकतो. आपल्याकडे काही महिन्यांतच जागतिक दर्जाचे फाउंडेशनल एआय मॉडेल असेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.