पुढारी ऑनलाईन डेस्क : आम आदमी पार्टीचे (आप) राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांच्या लुधियाना येथील घरावर ईडीने आज (दि. ७) छापा टाकला. याशिवाय फायनान्सर हेमंत सूदच्या घरावरही ईडीने छापे टाकले आहेत. मनी लॉड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आम्ही झुकणार नाही, अशी X पोस्ट आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी केली आहे.
ईडीच्या पथकांनी सकाळी संजीव अरोरा यांच्या घरासह त्यांच्या काही जवळच्या व्यावसायिक भागीदारांवर छापे टाकले. हेमंत सूद हे माजी कॅबिनेट मंत्री भारतभूषण आशू यांचे निकटवर्तीय आहेत. धान्य वाहतुक प्रकरणात भारतभूषण यांचे नाव पुढे आल्यानंतर केलेल्या तपासात आता हेमंत सूदवर कारवाई करण्यात आली आहे. ईडीचे अधिकारी सकाळी हेमंत सूद यांच्या चंदीगड रोडवरील हॅम्प्टन होम्समध्ये पोहोचले. तपासादरम्यान पुढील तपासासाठी अनेक कागदपत्रे जप्त करण्यात येत आहेत. संगणकात फेड केलेला डेटाही तपासला जात आहे.
अरोरा यांच्यावरील ईडीने छापा टाकल्यानंतर आम आदमी पार्टीने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मनीष सिसोदिया यांनी आपल्या Xपोस्टमध्ये लिहिले आहे की, आज पुन्हा मोदीजींनी त्यांच्या पोपट मैनाला मुक्त केले आहे. आज सकाळपासून ईडीचे लोक आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांच्या घरावर छापे टाकत आहेत. गेल्या दोन वर्षात त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापे टाकले. माझ्यासह संजय सिंह, सत्येंद्र जैन यांच्या घरावर छापा टाकला... कुठेही काहीही सापडले नाही. पण मोदीजींच्या एजन्सी एकामागून एक खोट्या केसेस बनवण्यात व्यस्त आहेत. आम आदमी पार्टी तोडण्यासाठी हे लोक कोणत्याही थराला जातील. पण कितीही प्रयत्न केले तरी आम आदमी पार्टीचे लोक थांबणार नाहीत, झुकणार नाहीत घाबरणार नाहीत.
देव आम आदमी पक्षाच्या पाठीशी आहे आणि घाबरण्याची गरज नाही कारण कोणतीही चूक झाली नाही, असे पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.