पुणे : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. तसेच, काही नवीन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने वार्षिक परीक्षेच्या कॅलेंडरमध्ये बदल करण्यात आले असून, सुधारित कॅलेंडर जाहीर करण्यात आले आहे.
यूपीएससीने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, नागरी सेवा पूर्वपरीक्षा २५ मे २०२५ रोजी होणार आहे. २२ जानेवारी २०२५ रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ फेब्रुवारी २०२५ असेल.
भारतीय वनसेवा (प्राथमिक) परीक्षा २५ मे २०२५ रोजी होणार आहे. अभियांत्रिकी सेवा (प्राथमिक) परीक्षा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. १८ सप्टेंबर २०२४ रोजी अधिसूचना जारी केली. जाईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर २०२४ असेल. संयुक्त भू-शास्त्रज्ञ (प्राथमिक) परीक्षा १९ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे.
४ सप्टेंबर २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ सप्टेंबर २०२४ असेल. संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा १३ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. ११ डिसेंबर २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ असेल. राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा १३ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.
११ डिसेंबर २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ असेल. सुधारित वेळापत्रक जरी जाहीर करण्यात आले असले तरी 'अधिसूचना, प्रारंभ आणि परीक्षा/भरती चाचणीच्या तारखा परिस्थितीनुसार बदलू शकतात. नवीन तारखांनुसार कोणती परीक्षा कधी होणार, हे वेळोवेळी कळविले जाईल, असे देखील यूपीएससीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.