

Kotak Mahindra Bank on Noida Account Receiving Over ₹1 trillion
नोएडा: नोएडात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणाच्या मृत्यू झालेल्या आईच्या बँक खात्यात अब्जावधी रुपये जमा झाल्याच्या वृत्तावर कोटक महिंद्रा बँकेने स्पष्टीकरण दिले आहे. संबंधित वृत्त चुकीचे आणि निराधार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
नोएडातील बँक खात्याचे प्रकरण काय आहे?
ग्रेटर नोएडाच्या दनकौर परिसरातील दीपक नावाच्या तरुणाच्या मृत आईच्या खात्यात अंदाजे ही रक्कम एक लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त (10,01,35,60,00,00,00,00,00,01,00,23,56,00,00,00,00,299 रुपये) रक्कम जमा झाल्याचा मेसेज त्याला मिळाला. एवढी मोठी रक्कम खात्यात आल्याचे पाहून दीपकला क्षणभर काय करावे हेच सुचले नाही, असे वृत्त उत्तर भारतातील माध्यमांमध्ये झळकले होते. या असामान्य व्यवहारानंतर बँकेने तात्काळ खाते गोठवले असून, आयकर विभागाने या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केल्याचा दावाही करण्यात आला होता.
बँकेकडून खाते गोठवल्याचा दावा
दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.४) सकाळी दीपकने बँकेत जाऊन खात्री केली असता, बँक अधिकारीही हा आकडा पाहून थक्क झाले. त्यांनी दीपकला सांगितले की, एवढ्या मोठ्या आणि असामान्य व्यवहारामुळे हे खाते तात्काळ गोठवण्यात (Freeze) आले. बँकेने तातडीने या प्रकरणाची माहिती आयकर विभागाला दिली असून, आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचंही सांगितलं जात होतं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच, १९ वर्षीय दीपकला नातेवाईक, शेजारी आणि ओळखीच्या लोकांकडून सतत फोन येऊ लागले. या त्रासाला कंटाळून त्याने आपला फोन बंद केल्याचं सांगितलं जात होतं.
बँकेने काय म्हटले आहे?
ग्राहकाच्या खात्यात मोठी रक्कम जमा झाल्याचा दावा करणारे माध्यमांतील वृत्त चुकीचे आहे. ग्राहकांनी कोटक मोबाईल बँकिंग ॲप किंवा नेट बँकिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून आपल्या खात्याचा तपशील तपासावे. तसेच आमची प्रणाली सामान्यपणे कार्यरत असून, सर्व सेवा सुरक्षित आणि पूर्णपणे कार्यान्वित आहेत, असं बँकेने म्हटले आहे.