सोनिया गांधी : 'मोदी देशाचे पंतप्रधान, जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करा' | पुढारी

सोनिया गांधी : 'मोदी देशाचे पंतप्रधान, जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करा'

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी पंतप्रधानांच्या ताफ्याच्या सुरक्षेतील त्रुटी नाकारल्या असल्या, तरी काँग्रेसच्या उच्चस्तरीय नेत्यांची त्यांच्याशी चर्चा झाली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चन्नी यांच्याकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात यावी, असे त्यांनी चन्नी यांना सांगितले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या संभाषणात सोनियांनी चन्नी यांना सांगितले की, या प्रकरणात जे कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या दौऱ्यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ठेवायला हवी होती.

चौकशी करत आहोत; चन्नींकडून सोनियांना उत्तर

पंजाब सरकार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असल्याचे चन्नी यांनी सोनिया गांधी यांना सांगितले. यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल आणि राज्याचे गृहसचिव अनुराग वर्मा यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला ३ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात जो कोणी जबाबदार असेल, त्यांच्यावर सरकार कारवाई करेल.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बुधवार, ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांना तेथे जाण्यासाठी रस्त्यांचा वापर करावा लागला. यादरम्यान पंजाबमधील हुसैनीवाला येथील उड्डाणपुलावर पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी दिसून आली. सुरक्षेतील त्रुटींमुळे पंतप्रधानांना त्यांचा दौरा रद्द करून परतावे लागले.

हे ही वाचलं का ?

Back to top button