Prime Minister Security : पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता | पुढारी

Prime Minister Security : पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या हलगर्जीपणाविषयी चिंता व्यक्त केली. (Prime Minister Security)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षाविषयक हलगर्जीपणाविषयी त्यांच्याकडून जाणून घेतले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या गंभीर घटनेविषयी चिंता व्यक्त केली.

त्यानंतर उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीदेखील पंजाबमध्ये झालेल्या घटनेविषय़ी पंतप्रधानांसोबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी उपराष्ट्रपती नायडू यांनी सुरक्षा व्यवस्थे झालेल्या हलगर्जीपणाविषयी गंभीर चिंता व्यक्त केली.भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी सुरक्षा प्रोटोकॉलचे कठोरपणे पालन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

पंजाबमध्ये नेमकं काय घडलं?

पंजाबमधील रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रूटी राहिल्याने रद्द करण्यात आली. कारण, आंदोलकांनी ताफा अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना १५ ते २० मिनिटं उड्डाण पुलावर थांबावं लागलं. मोदींच्या दौऱ्याची कल्पना असताना आणि राज्य सरकारने मोदींच्या सरक्षणाची हमी दिली असतानाही, त्यात घोडचूक झाल्याने भाजपकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकारावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया समोर आलेली असून त्यांनी म्हंटलं आहे की, “तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो”, अशी प्रतिक्रिया मोदींनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांशी बोलताना दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे प्रचारसभा होणार होता. त्यामुळे ते भटिंडा येथे पोहोचले आणि तेथून ते हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे जाणार होते. परंतु, पाऊस आणि खराब वातावरण यामुळे पंतप्रधानांना हवामान स्वच्छ होण्याची वाट पाहावी लागली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने रस्त्याने ते राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचा निर्यण घेतला. (Prime Minister Security)

आता हा प्रवास २ तासांचा होता. अशात गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी करण्यात आली होती. या भरोशावर पंतप्रधान रस्त्याने प्रवासासाठी निघाले. मात्र, राष्ट्रीय स्मारकापासून केवळ ३० किलोमीटर पंतप्रधानांचा ताफा आला असताना त्या उड्डाणपुलावर काही आंदोलकांनी रस्ता अडविला. त्यामुळे पंतप्रधानांना पुन्हा २० मिनिटं थांबावे लागले.

यावर गृहमंत्रालयाने सांगितले की, “या सुरक्षेतील त्रुटींनंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परत आणण्यात आला. सुरक्षेतील या गंभीर त्रुटीची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, असेही राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे मोदींची फिरोजपूर रॅली रद्द करण्यात आली आहे.”

पहा व्हिडीओ : वेदनेशी आणि भुकेशी नातं सांगणाऱ्या सिंधुताईंचा संघर्षमय प्रवास

Back to top button