नरेंद्र मोदी यांच्या नव्या कारवरून काँग्रेसची टीका | पुढारी

नरेंद्र मोदी यांच्या नव्या कारवरून काँग्रेसची टीका

नवी दिल्ली ; पीटीआय : कोरोना आपत्तीमुळे देशाची अर्थव्यवस्था खालावलेली असतानाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नव्या मेबॅक या लक्झरी कारची खरेदी केल्यावरून काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसचे प्रवक्‍ता गौरव वल्लभ म्हणाले, पंतप्रधान स्वतःला फकीर म्हणवून घेतात; पण आता देशातील प्रत्येकालाच मोदींसारखे फकीर व्हायचे आहे. जो आठ हजार कोटींच्या विमानातून उड्डाण करतो, 20 कोटींच्या कारमधून फिरतो आणि दोन हजार कोटी खर्चून घर बांधतो.

2014 मध्ये मोदी महिंद्रा स्कॉर्पिओ वापरत होते. आता स्वदेशी कार टाळून परदेशी बनावटीची कार खरेदी केल्यावरून मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या धोरणावरही वल्लभ यांनी टीका केली आहे. 2014 नंतर मोदींनी भारतीय कार वापरलेली नाही.

भारताने लोकांची काळजी वाहणारे पंतप्रधान पाहिलेत; पण दरवर्षी कार बदलणारे मोदीच आहेत. कोरोनाने आमच्या खरेदी क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. कपड्यांची दुसरी जोडी खरेदी करताना सर्वसामान्य माणूस दोनवेळा विचार करतो, असे ते म्हणाले.

ताफ्यात ‘मर्सिडीज मेबॅक एस-650’

मोदींच्या ताफ्यात मेबॅक एस-650 कारची खरेदी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी पूर्वी वापरत असलेल्या बीएमडब्ल्यू कारचे उत्पादन थांबल्याने ही नवी कार घेतलीे. माध्यमांत छापून आलेल्या किमतीच्या एक तृतीयांश किमतीत ही कार खरेदी केल्याच सूत्रांनी सांगितले.

Back to top button