मराठी मिसाईल मॅन अतुल राणे ‘ब्राह्मोस एअरोस्पेस’च्या प्रमुखपदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मराठी मिसाईल मॅन अतुल राणे यांची 'ब्राह्मोस एअरोस्पेस' च्या प्रमुखपदी निवड झाली असून, त्यांनी 'डीआरडीओ'मध्ये (संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था) शास्त्रज्ञ म्हणून 34 वर्षे दिलेल्या सलग व उत्कृष्ट सेवेचा सन्मान म्हणून ही निवड करण्यात आली आहे.
'ब्राह्मोस एअरोस्पेस लिमिटेड'चे 'सीईओ' (मुख्य कार्यकारी अधिकारी) आणि मॅनेजिंग डायरेक्टर (व्यवस्थापकीय संचालक) पदाचा कार्यभार राणे यांनी स्वीकारला आहे. ब्राह्मोस एअरोस्पेस लिमिटेड ही कंपनी सुपरसोनिक क्रूझ मिसाईल तयार करते, हे येथे उल्लेखनीय!
'मिशन क्रिटिकल ऑनबोर्ड कॉम्प्युटर'चे स्वदेशी डिझाईन तयार करणे आणि विकसित करणे, 'लूप सिम्युलेशन स्टडीज्'मध्ये हार्डवेअर, सिस्टीम अॅनालिसिस करणे यासह 'मिशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट'च्या विकास आणि डिफेन्स अॅप्लिकेशनच्या अॅव्हियोनिक्स तंत्रज्ञानामध्ये राणे हे 1987 पासून सातत्यपूर्ण योगदान देत आहेत.
राणे यांनी भारतात विकसित होत असलेल्या आकाश क्षेपणास्त्र यंत्रणेतील 'मॉड्युलर रिअल टाईम सिम्युलेशन' चाचणी तंत्र विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 'ऑनबोर्ड कॉम्प्युटर डिव्हिजन'मध्ये 'अग्नी-1' क्षेपणास्त्रासाठी नियुक्त 'ऑनबोर्ड मिशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट' कार्यक्रमाचे नेतृत्व केले.
राणे यांचे पदव्युत्तर शिक्षण पुण्यातून
अतुल राणे हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा या गावचे मूळ रहिवासी आहेत. त्यांनी चेन्नई अभियांत्रिकी महाविद्यालयातून 'इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन'मध्ये पदवी संपादित केली. पदव्युत्तर शिक्षण पुण्यातून पूर्ण केले. सन 1987 मध्ये ते 'डीआरडीओ'मध्ये रुजू झाले.