दहशतवादासाठी अफगाण भूमीचा वापर नको - पुढारी

दहशतवादासाठी अफगाण भूमीचा वापर नको

नवी दिल्ली ; पीटीआय : अफगाण भूमीचा वापर दहशतवादी कारवाई, प्रशिक्षण अथवा टेरर फंडिंगसाठी वापर करण्यापासून रोखणे आणि अफगाणिस्तानातील नागरिकांनी मानवी द‍ृष्टिकोनातून मदत करण्यावर रविवारी झालेल्या मध्य आशियातील पाच देशांच्या परिषदेत एकमत झाले.

दहशतवादाला रोखणे हे जगासमोरील मोठे आव्हान असून सीमेपलीकडून होणारी कोणत्याही प्रकारची घुसखोरी आणि कारवाया खपवून घेणार नसल्याचे सांगत मानवी मूल्यांची जपणूक करण्यासाठी परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्यावर नेत्यांनी सहमती दर्शवली. प्रत्येक देशाच्या सार्वभौमत्वाचा आदर राखून प्रादेशिक स्वायतत्ता राखण्यावर नेत्यांनी भर दिला.

या परिषदेचे यजमानपद भारताकडे असल्याने भारताचे पररराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मध्य आशियातील देशांशी डायलॉग केला. परिषदेला कझाकिस्तान, ताझीकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझेबिकिस्तान आणि किर्गीझ रिपब्लिक या देशांच्या पररराष्ट्रमंत्र्यांनी सहभाग घेतला. यावेळी संयुक्तपणे निवेदन काढण्यात आले.

अफगाणिस्तानात शांतता, स्थिरता प्रस्थापित करण्यावर नेत्यांनी भर दिला. अफगाणिस्तानचे सार्वभौमत्व, एकता, अन्य देशांचा हस्तक्षेप रोखण्यावर परस्पर सहकार्य करण्यासह मानवी भावनेतून तालिबानी राजवटीत आत्मविश्‍वास गमावलेल्या अफगाण नागरिकांप्रती प्रेमभाव ठेवून त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी जगभरातील देशांनी पुढे येण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

अफगाणिस्तानातील प्रश्‍नांत संयुक्‍त राष्ट्र संघाची भूमिका महत्त्वाची असून अफगाण महिलांना अधिकार प्राप्त करून देण्यासह अन्य महत्त्वाच्या प्रश्‍नांत संयुक्त राष्ट्र संघाने सर्वसमावेशक कृती करून त्यांना मुक्‍त वातावरणात राहता यावे, यासाठी प्रयत्न करून त्यांच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया परिषदेला उपस्थित असलेल्या नेत्यांनी व्यक्‍त केली.

Back to top button