नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
प्रजासत्ताक दिनाच्या ( Republic Day ) सोहळ्यासाठी मध्य आशियातील पाच देशांचे नेते भारतात प्रमुख पाहुणे म्हणून यंदा उपस्थित राहतील. कझाकिस्तान , किर्गिस्तान , ताजिकिस्तान , तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचे नेते प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रामुख्यााने उपस्थित राहणार आहेत.
२०१८ मध्ये आसियान बैठकीच्या निमित्ताने सर्व सदस्य देशांचे नेते प्रजासत्ताक दिनी ( Republic Day ) पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानंतर आता सर्व पाच मध्य आशियातील देशांचे नेते भारताचे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे गेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन भारतात पाहुणे म्हणून येणार होते. पंरतु, इंग्लंडमधील कोरोना संकटाची तीव्रता वाढल्याने बोरिस जॉनसन यांचा भारत दौरा रद्द झाला होता.
पाहुणे म्हणून आमंत्रित करायच्या नेत्यांसोबत मागील तीन आठवड्यांपासून चर्चा सुरू होती. पाचही मध्य आशियातील देशांचे नेते उपस्थित राहणार याची खात्री झाल्यानंतर औपचारिक आमंत्रणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अमेरिकेतील भूगर्भ तज्ज्ञांच्या एका अहवालानुसार जगात सर्वाधिक ९ लाख ६३ हजार टन थोरियमचा साठा भारतात आहे. तसेच १ लाख २९ हजार टन युरेनियमचा साठा भारताकडे आहे. जगातील अनेक देश ऊर्जेसाठी थोरियम आणि युरेनियम या मूलद्रव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याच्या योजना आखत आहेत. या हालचाली सुरू असताना मध्य आशियातील सर्वच्या सर्व पाच देशांनी भारताच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय सोहळ्याला उपस्थित राहणे हे राजनयिक संबंधाच्या अनुषंगाने महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये मध्य आशियातील सर्वच्या सर्व पाच देशांचा दौरा केला होता. सर्व मध्य आशियातील देशांचा दौरा करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. यानंतर भारत आणि मध्य आशियातील पाच देश यांच्यात परराष्ट्र मंत्र्यांच्या पातळीवर शिखर परिषदेला सुरुवात झाली. आतापर्यंत दोनवेळा ही शिखर परिषद झाली. यंदा १८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी भारतात ही शिखर परिषद आहे. या परिषदेनंतर जेमतेम ५-६ आठवड्यांनी असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला मध्य आशियातील पाच देशांचे नेते पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात प्रत्येक प्रजासत्ताक दिनी भारतात आलेले पाहुणे चर्चेचा विषय झाले. पाहुणे म्हणून आमंत्रण देऊन भारत संबंधित देशासोबतचे मैत्रीचे संबंध अधिकाधिक दृढ करत आहे. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा २०१५ मध्ये तर फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सरकोझी २०१६ मध्ये प्रजासत्ताक दिनी पाहुणे म्हणून भारतात आले होते. यानंतर यूएईचे मोहम्मद बिन जायद अल नाहयान २०१७ मध्ये, दहा आसियान देशांचे नेते २०१८ मध्ये, दक्षिण आफ्रिकेचे सिरिल रामफोसा २०१९ मध्ये आणि ब्राझिलचे जायर बोल्सोनारो २०२० मध्ये प्रजासत्ताक दिनी पाहुणे म्हणून भारतात आले होते.
याआधी मध्य आशियातील कझाकिस्तानचे नेते २००९ मध्ये प्रजासत्ताक दिनी पाहुणे म्हणून भारतात आले होते. यानंतर मध्य आशियातील एकाही देशाचा नेता प्रजासत्ताक दिनी भारताचा पाहुणा नव्हता.
हेही वाचलं का?