नवी दिल्ली; वृत्तसंस्था : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) मंगळवारी घेण्यात आलेली यूजीसी-नेट परीक्षा बुधवारी रद्द करण्यात आली. सायबर सिक्युरिटीकडून नेट परीक्षेतील गैरप्रकाराबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) अलर्ट मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
नीट-यूजीसीतील गैरप्रकाराची चौकशी सुरू असतानाच आता नेट-यूजीसीतील गैरप्रकार चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. मंगळवारीच (दि. 18) नेट परीक्षा झाली आणि दुसर्याच दिवशी ती रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. देशभरात दोन सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली होती. सायबर सिक्युरिटीकडून परीक्षेतील गैरप्रकाराची माहिती यूजीसीला प्राप्त झाली. नेट परीक्षेमध्येही पेपरफुटीची शक्यता वर्तविण्यात आल्याने नेट परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.