Southwest Monsoon | जुलैपर्यंत ‘ला निना’! ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस, IMD ची माहिती

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाई डेस्क : मध्य आणि विषुववृत्तीय प्रशांत महासागरासह समुद्राचे तापमान थंड होत आहे. यामुळे तटस्थ एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) परिस्थिती लवकरच उदयास येऊ शकते. यामुळे मान्सून हंगामातील (Southwest Monsoon) ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस पडेल, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.

गेल्या वर्षी प्रशांत महासागरात 'एल निनो' परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे त्याचा मॉन्सूनवर प्रतिकूल परिणाम झाला. परिणामी गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. तसेच हिंवाळाही उबदार गेला. पण आता जगभरातील अनेक हवामान संस्थांनी येत्या मान्सून हंगामात 'ला निना' परत येण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः ला- निना स्थिती जुलैपर्यंत सक्रिय होईल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ENSO म्हणजे काय?

ENSO ही एक नैसर्गिकरित्या घडणारी हवामान घटना आहे जी महासागराच्या वातावरणातील परस्परसंवादामुळे उद्भवते. ही परिस्थिती मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरासह समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानावर परिणाम करते.

ENSO चे तीन टप्पे

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ENSO चे तीन टप्पे आहेत. उबदार स्थिती एल निनोशी संबंधित आहे. तर तटस्थ आणि थंड परिस्थिती ला निनाशी संबंधित आहे. ENSO जागतिक हवामानावर परिणाम करते आणि अतिवृष्टी, उष्णता आणि थंडीची लाट रूपात तीव्र हवामानाला चालना देते. ENSO तटस्थ परिस्थिती जून आणि जुलै-सप्टेंबर दरम्यान उदयास येईल. एन्सो स्थिती 'ला निना'मध्ये बदलेल, असे सोमवारी हवामान विभागाने सांगितले.

मान्सून अरबी समुद्रात

मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे. केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून कोणत्याही क्षणी धडकण्याची शक्यता असल्याने चार महिन्यांच्या मुख्य पावसाळी हंगामाची सुरुवात झाली आहे. येत्या काही महिन्यांत ला निना सक्रीय होणार असल्याने या वर्षी चांगला पावसाची आशा निर्माण झाली आहे.

'ला निना'मुळे काय होईल?

"मान्सून हंगामातील पावसावर परिणाम करणारे मान्सून कमी दाब प्रणाली आणि तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) यासारखे इतर अनेक घटक असले तरी ला निना हे प्रमुख घटकांपैकी एक आहे. ला निनामुळे वर्षात सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता असते. या वर्षी ला निना परिस्थितीमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस पडू शकतो," असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितले.

कुठे पडेल अधिक पाऊस?

हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण द्वीपकल्प आणि मध्य भारतात सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. वायव्य भारतात पावसाचे प्रमाण सामान्य राहील. तर पूर्व आणि ईशान्य भारतात जून-सप्टेंबर कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळांची शक्यता अधिक

हवामानशास्त्रीयदृष्ट्या, ला निना स्थिती भारतीय मान्सूनसाठी अनुकूल म्हणून ओळखली जाते. पूर्व आणि ईशान्य भारत वगळता, ला निना वर्षात देशाच्या उर्वरित भागात पाऊस एकतर सामान्य अथवा त्याहून जास्त असतो. त्याचवेळी ला निना सक्रियतेच्या काळात चक्रीवादळांची शक्यता सामान्यपेक्षा अधिक असते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news