भारताने पाकिस्तानचा सन्मान करावा; काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांचे वादग्रस्त विधान

भारताने पाकिस्तानचा सन्मान करावा; काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांचे वादग्रस्त विधान
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे अणूबॉम्ब असल्याच्या मुद्यावर वादग्रस्त विधान केल्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मणीशंकर यांच्या विधानाशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा काँग्रेसने केला असला तरीही भाजपने मात्र, काँग्रेसला घेरण्याची तयारी सुरू केली आहे.

पाकिस्तानकडे अणूबॉम्ब असल्यामुळे भारताने वाटाघाटी करताना त्यांचा सन्मान राखावा, असे वादग्रस्त विधान परिषदेच्या मणीशंकर अय्यर यांनी केले आहे. 'मेमॉयर्स ऑफ ए मेवरिक' आणि 'द राजीव आय न्यू' या आपल्या पुस्तकाशी संबंधित विषयावर 'चिल पिल' सोबत चर्चा करताना मणीशंकर अय्यर यांनी हे विधान केले आहे. मात्र, हा व्हिडिओ जुना असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानवर सैन्य बळाचा वापर केल्यामुळे उभय देशांमधील तणाव वाढत चालला आहे. हा तणाव असाच वाढत राहिल्यास पाकमधील एखादे डोके फिरलेले सरकार भारतावर अणूबॉम्ब टाकण्याची भीती आहे. त्यामुळे भारताने पाकचा सन्मान राखून त्यांच्याशी शांततापूर्ण बोलणी करावी, असा सल्लाही मणीशंकर अय्यर यांनी या चर्चेत दिला आहे. पाकने लाहोरवरून अणुबॉम्ब टाकल्यास अवघ्या ८ सेकंदात अमृतसरवर किरणोत्सर्गाचा परिणाम होईल. भारताला विश्वगुरू बनायचे असेल तर पाकिस्तानसोबत संबंध सुधारून त्यांच्याशी वाटाघाटी करणे आवश्यक असल्याचे अय्यर यांनी म्हटले आहे.

यापूर्वी सॅम पित्रोदा यांच्या विधानावरून अडचणीत आलेल्या काँग्रेसने ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पित्रोदा यांना हटवून या वादावर पडदा टाकला. मात्र, आता मणीशंकर अय्यर यांच्या विधानामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मणीशंकर अय्यर यांच्या विधानाशी काँग्रेसचा काहीही संबंध नसून पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना कुठलाही अधिकार दिला नसल्याचे काँग्रेसचे नेते पवन खेड़ा यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तानविरुद्ध काँग्रेसने नेहमी कणखर भूमिका घेतली आहे. डिसेंबर १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी निर्णायक भूमिका घेऊन स्वतंत्र बांग्लादेशची निर्मिती केल्याची आठवण खेडा यांनी करून दिली.

मणीशंकर अय्यर यांच्या विधानावरुन भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांच्या काँग्रेसची विचारधारा या निवडणुकीतून दिसून आली आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडियावरील एक्सवर केलेल्या पोस्टमधून दिली आहे. सियाचीन सोडण्यासाठी पाकिस्तानला समर्थन, लोकांचे विभाजन, गरिबांना खोट्या व दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांची गॅरंटी देणे, हीच काँग्रेसची नीती आहे. पाकिस्तान आणि तेथील दहशतवाद्यांची माफी मागणारा पक्ष ही काँग्रेसची ओळख बनली असल्याचे चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नेते भारतात राहतात, पण त्यांचे हृदय मात्र पाकिस्तानात असते, अशी टीका केंद्रीय मंत्री व भाजप नेते अनुराग ठाकुर यांनी केली आहे. पाकिस्तानला धडा शिकविणे भारताला चांगले माहित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news