Lok Sabha Election 2024 : मध्यप्रदेशमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला आग; अधिकाऱ्यांनी जळत्या बसमधून मारल्या उड्या

मध्यप्रदेशमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला आग
मध्यप्रदेशमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला आग
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ईव्हीएम आणि निवडणूक अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली. ही बस सहा मतदान केंद्रावरील मतदान साहित्य आणि कर्मचारी घेऊन बैतूल जिल्हा मुख्यालयाकडे जात असताना ही घटना घडली. यामध्ये काही ईव्हीएमचे नुकसान झाले असून चालकासह अधिकाऱ्यांनी जळत्या बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला.

सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिसनूर आणि पौनी गौला गावादरम्यान हा अपघात झाला. याबाबत माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बैतूल, मुलताई आणि आठनेर येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बसची आग विझवली आणि आत ठेवलेले मतदान साहित्य बाहेर काढले. त्यानंतर मतदान कर्मचारी आणि ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन आणण्यासाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली. या अपघातात सर्व मतदान कर्मचारी सुरक्षित आहेत.

  • लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९३ जागांसाठी मतदान झाले.
  • सरासरी ६४.५८ टक्के मतदान झाले. आसाममध्ये सर्वाधिक ८१.७१ टक्के मतदान झाले.
  • पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचार वगळता मतदान शांततेत पार पडले.
  • तिसऱ्या टप्प्यापर्यंत २८० जागांवर मतदान झाल्याने लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागांसाठी निवडणूक पूर्ण झाली.
  • बैतूल लोकसभेसाठी ७२.६५ टक्के मतदान झाले.
  • मतदानानंतर बैतूल जिल्ह्यात ईव्हीएम घेऊन जाताना बसला आग लागली.

या बूथवर पुन्हा मतदान?

बसमध्ये स्पार्क झाल्याने आग लागली, मतदान कर्मचारी आणि बस चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही, असे बैतुलचे जिल्हाधिकारी नरेंद्र सूर्यवंशी यांनी पीटीआयला सांगितले. या आगीत बुथ क्रमांक २७५, २७६, २७७, २७८, २७९ आणि २८० या चार मतदान केंद्रांच्या ईव्हीएमचे नुकसान झाले आहे. बसमध्ये सहा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट होते, त्यापैकी चार ईव्हीएम जळाले आहेत. तर दोन सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ईव्हीएममध्ये झालेल्या मतमोजणीवर परिणाम होईल का, असे विचारले असता, जिल्हाधिकारी म्हणाले की, ते याबाबत आपला अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवतील आणि या बूथवर पुन्हा मतदान घेण्याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेईल.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news