हेरॉन ड्रोन ची आता ‘ड्रॅगन’वर करडी नजर | पुढारी

हेरॉन ड्रोन ची आता ‘ड्रॅगन’वर करडी नजर

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारतीय लष्कराला इस्रायलकडून अत्याधुनिक हेरॉन ड्रोन मिळाले आहे. या ड्रोनद्वारे लडाखमधील दुर्गम भागात लक्ष ठेवण्यासाठी लष्कराला मदत होणार आहे. विशेषतः, चीनच्या कोणत्याही कुरापती लपून राहणार नाहीत. कोरोना संसर्गामुळे हे ड्रोन भारताला इस्रायलकडून मिळण्यास उशीर झाला.

लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, इस्रायलकडून हेरॉन ड्रोन खरेदी केले आहे. हे ड्रोन पूर्व लडाख परिसरातील टेहळणी करण्यासाठी तैनात केले जाणार आहे. सध्या भारतीय लष्कराकडे उपलब्ध असलेल्या अन्य ड्रोनपेक्षा हेरॉन ड्रोन खूपच अत्याधुनक आहे.

हेरॉन ड्रोनमधील अँटी जॅमिग क्षमताही सर्वोत्तम आहे. काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारने ड्रोन खरेदी करण्यासाठी लष्कराला मान्यता दिली होती. कुरापतखोर चीनचे आव्हान रोखण्यासाठी आणि लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी लष्कराला परवानगी दिली होती. हेरॉन ड्रोनशिवाय छोटे आणि मध्यम आकाराचे ड्रोनही भारतीय कंपन्यांकडून खरेदी केले जात आहेत.

दरम्यान, लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या भारतीय सीमेवर चीनच्या कुरापती वाढल्याने भारताची चिंता वाढली आहे. सीमेवर गलवान संघर्षासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांकडून युद्ध सज्जता म्हणून मोठ्या प्रमाणावर संरक्षण शस्त्रे, हेलिकॉप्टर्स, लढाऊ विमाने सीमेवर तैनात केली आहेत.

35 हजार फूट उंचीवर उड्डाण भरण्याची ड्रोनची क्षमता

शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे ड्रोन सर्वाधिक विश्‍वासार्ह मानले जाते. या ड्रोनची टेहळणी क्षमता अजोड आहे. 35 हजार फूट उंचीवर सलग 52 तास उड्डाण भरण्याची या ड्रोनची क्षमता आहे. तसेच 30 हजार फूट उंचीवरून भारतीय जवानांना हे ड्रोन फिडबॅक देऊ शकते. या ड्रोनमध्ये 200 हॉर्स पॉवरचे डिझेल इंजिनही बसवण्यात आले आहे. या ड्रोनमध्ये सातत्याने सुधारणा केल्या गेल्या आहेत.

Back to top button