पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपच्या जेष्ठ नेत्या मेनका गांधी आणि त्यांचा मुलगा वरुण गांधी यांच्यातील पिलीभीतमधील मागील ३५ वर्षांपासूनचे राजकीय नाते बुधवार, २७ मार्च रोजी संपुष्टात आले. 1989 नंतर पहिल्यांदाच दोघांनीही पिलीभीतमधून उमेदवारी दाखल केली नाही. भाजपने वरुण गांधी यांचे तिकीट रद्द करून यूपीचे कॅबिनेट मंत्री जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. वरुण गांधी यांनी पिलीभीतसोबतचे राजकीय संबंध संपुष्टात आल्यावरुन एक्स हँडलवर भावनिक पत्र शेअर केले आहे.
आपल्या पत्रात वरुण गांधींनी पत्रात नमूद केले आहे की, "मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला पीलीभीतच्या महान लोकांची वर्षानुवर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. येथे आढळणारे आदर्श, साधेपणा आणि दयाळूपणाचा माझ्या संगोपनात आणि विकासात केवळ खासदार म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही मोठा वाटा आहे. आता पिलीभीतचा खासदार म्हणून माझा कार्यकाळ संपत आहे; पण पिलीभीतशी माझे नाते माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत संपणार नाही.. मला कितीही किंमत मोजावी लागली तरी मी तुमच्याबरोबर आहे आणि सदैव राहिन."
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू आणि संजय गांधी यांचे पुत्र असणारे वरुण गांधी यांनी २००९ -१० मध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस पद भूषवले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपने पिलीभीत मतदारसंघातून उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्याऐवजी जितीन प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तरु वरुण गांधी यांच्या आई व माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना सुलतानपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. पक्ष वरुण यांना संघटनेत मोठे पद देऊ शकते, अशी चर्चा आहे. तिकीट नाकारल्यानंतरही वरुणने भाजप सोडलेला नाही किंवा तसे संकेतही दिलेले नाहीत. त्यामुळे भाजप त्यांना उत्तर प्रदेशमधील अन्य मतदारसंघातून उमेदवारी देईल, अशीही चर्चा आहे.