नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत अजित पवार गटाला निवडणुकीत घड्याळ चिन्ह सशर्त वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसेच शरद पवार गटालाही तुतारी हे चिन्ह वापरता येणार आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत शरद पवार गट 'तुतारी वाजवणारा माणूस,' तर अजित पवार गट 'घड्याळ' या चिन्हासह निवडणूक लढणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना देण्याचा निर्णय दिला. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याापूर्वी झालेल्या सुनावणीत शरद पवारांचा फोटो वापरणार नाही, याची लेखी हमी द्या, असे आदेशच न्यायालयाने अजित पवार गटाला दिले होते. त्याप्रमाणे तसे प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाने न्यायालयाला दिले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी 6 आठवड्यांनी होणार आहे. परंतु, न्यायालयाच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहता हे प्रकरण आता जुलैमध्येच ऐकले जाण्याची शक्यता आहे. तेव्हा लोकसभेच्या निवडणुका होऊन नवे सरकार आलेले असेल.
आजच्या सुनावणीत शरद पवार गटाकडून अजित पवार गटाविरुद्ध जोरदार युक्तिवाद करण्यात आला. अजित पवारांकडून घड्याळ हे चिन्ह काढून घेण्यात यावे, सुरुवातीपासून घड्याळ चिन्ह शरद पवारांकडे आहे. पक्ष शरद पवारांनी स्थापन केला आहे. अजूनही अनेक ठिकाणी घड्याळ आणि शरद पवार एकच मानले जाते, असा युक्तिवाद शरद पवार गटाने केला. न्यायालयाने त्यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले. मात्र, या प्रकरणावरील निर्णय होईपर्यंत अजित पवारांना घड्याळ हे चिन्ह वापरता येईल; तर शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह वापरता येईल. परंतु, अजित पवार जिथे जिथे घड्याळ चिन्ह वापरतील तिथे तिथे त्यांना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे लिहावे लागणार आहे. तशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.
आमदार नीलेश लंके हे शरद पवारांचा फोटो वापरतात, असाही युक्तिवाद शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला होता. यावर नीलेश लंके हे शरद पवारांकडे गेले आहेत, असे अजित पवार गटाने सांगितले. मात्र, नीलेश लंके हे केवळ एका कार्यक्रमासाठी आमच्याकडे आले होते, पक्ष म्हणून ते अजित पवारांकडेच आहेत, असा युक्तिवाद शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.
'तुतारी' चिन्ह कोणाला मिळणार नाही
निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला देण्यात आलेले 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह आता केवळ शरद पवार गटाला वापरण्यात येणार आहे. कोणताही अन्य पक्ष किंवा उमेदवार हे चिन्ह वापरू शकणार नाही. कारण, पक्ष चिन्ह म्हणून ते शरद पवार गटाला देण्यात आले आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या बैठकीला शरद पवार गटाला बोलावण्यात आले नसल्याचा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला होता; तर निवडणूक आयोग किंवा अन्य संस्था पक्ष म्हणून राजकीय पक्षांना बैठकीला बोलवतात, तिथे आता शरद पवार गटालाही बोलावण्यात यावे, असेही न्यायालयाने सांगितले.