ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांची घेतली भेट; बिझनेस समिटचे दिले निमंत्रण | पुढारी

ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांची घेतली भेट; बिझनेस समिटचे दिले निमंत्रण

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

दिल्लीच्या दौऱ्यावर असणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये राजकीय मतभेद आहेत पण, याचा विकासावर परिणाम होऊ नये. पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या बिझनेस समिट उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आले होतो. त्याचा त्यांनी स्विकार केले आहे. तसेच राजकीय विरोध वेगळ्या जागी आहे. राज्याच्या विकासासाठी आमचे भेटणे चालू राहिल, राजकारण आणि विकासाचे नाते वेगवेगळे असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

संघराज्यांच्या अधिकाराबाबत चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, राज्यांच्या मुद्द्यांना घेऊन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यांमध्ये अनेक वादळं आली, इतर नैसर्गिक संकटे आली पण राज्यांना मदत म्हणून एक रुपया देखिल मिळाला नाही. मग राज्ये कशी चालणार? शिवाय संघराज्यांचे अधिकार आणि सीमा सुरक्षा दलाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचा पराभव व्हावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संघ राज्यांच्या अधिकारांविषयी देखिल चर्चा झाली. याशिवाय १२ ते १८ वर्षातील किशोरवयीन लोकांचे कोरोनाच्या लसीकरणाबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. ममता बॅनर्जी यांनी किमान हमी भावाचा कायदा व्हावा या विषयावर देखिल पंतप्रधानांशी चर्चा झाल्याची माहिती दिली. उत्तरप्रदेश मध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबत बॅनर्जी म्हणाल्या, उत्तर प्रेदशमध्ये भाजपचा पराभव व्हावा असे आम्हाला वाटते. यासाठी तेथील प्रमुख समाजवादी पक्ष व त्यांचे नेते अखिलेश यादव यांनी जर मदत मागितली तर आम्ही ती करायला तयार आहोत.

शरद पवार आणि उद्धव ठाकरें यांची घेणार भेट

यावेळी बोलताना मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या ३० नोव्हेंबर रोजी मुंबईच्या दौऱ्यावर जात आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button