५० लाख बॅरेल क्रूड ऑईल राखीव साठा लवकरच बाजारात | पुढारी

५० लाख बॅरेल क्रूड ऑईल राखीव साठा लवकरच बाजारात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी क्रूड ऑईल बाजारपेठ आहे आणि स्वाभाविकपणे भारत हा जगातील तिसरा मोठा क्रूड ऑईल आयातदार देश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर सातत्याने वाढत असल्याने त्याचा मोठा फटकाही अर्थातच भारताला बसलेला आहे. पेट्रोल, डिझेल दरातील अनुषंगिक वाढ सातत्याने सुरू असल्याने महागाई वाढलेली आहे. काही प्रमाणात का होईना त्याला आळा घालण्यासाठी तसेच क्रूड ऑईल उत्पादक देशांना प्रतीकात्मक विरोध दर्शविण्यासाठी क्रूड ऑईलचा 5 दशलक्ष बॅरेल राखीव (आरक्षित) साठा खुल्या बाजारात उपलब्ध करून देण्याची तयारी केंद्र सरकारने चालविली आहे.

क्रूड ऑईलचा साठा राखीव ठेवणे, हा देशाचा धोरणात्मक भाग असतो. आपत्कालीन प्रसंगासाठी तसे केले जाते. रूढ अर्थाने सध्या जगात कुठेही आपत्कालीन प्रसंग ओढवलेला नाही. याउपर अमेरिका, जपान आणि जगातील अन्य मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी क्रूड ऑईलचा राखीव साठाही सध्याच्या परिस्थितीत खुला केला आहे. किंबहुना, तशी वेळ या देशांवरही ओढवली आहे. आता भारतही या तयारीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या इंधन महागाईची दाहकता, तीव्रता कमी होऊन अर्थव्यवस्थेला दिलासा मिळावा, या हेतूनेच अमेरिका, जपान आदी देशांनी क्रूड ऑईलचा राखीव साठा खुला केला आहे. भारताने आपल्या आजवरच्या इतिहासात कधीही राखीव क्रूड ऑईलचा साठा खुला केलेला नाही, हे विशेष!

पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावर भारताचा हा साठा (5.33 दशलक्ष टन किंवा जवळपास 38 दशलक्ष बॅरेल) ‘अंडरग्राऊंड’ स्वरूपात राखून ठेवलेला आहे. त्यापैकी 5 दशलक्ष बॅरेल साठा खुला केला जाणार आहे. आगामी काळात आणखीही साठा खुल्या बाजारात उपलब्ध करून देण्यात येईल. तथापि, तशी अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे.

मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स तसेच हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनला हा साठा विकला जाईल. या दोन्ही कंपन्यांच्या पाईपलाईन राखीव साठ्याला जोडलेल्या आहेत, हे त्यामागचे कारण. केंद्राचा हा निर्णय तसेच ही कार्यवाही एका अर्थाने ‘ओपेक’ देशांच्या (क्रूड ऑईल पुरवठादार देश) मूल्यनिश्चितीतील एकाधिकारशाहीला प्रतीकात्मक विरोध असणार आहे. भारतासह अनेक देशांनी क्रूड ऑईल उत्पादक देशांना उत्पादनवाढ करण्याबाबत सुचवूनही हे देश तसे करत नाहीत, त्याचा निषेध करण्यासाठीची ही प्रतीकात्मक कृती आहे.

अमेरिकेने गेल्या आठवड्यात क्रूड ऑईल ग्राहक देशांना आपापले राखीव साठे खुले करून ‘ओपेक’ देशांना प्रतीकात्मक विरोध दर्शवावा, अशी विनंती चीन, भारत, जपान, ब्रिटन आदी मोठ्या आयातदार देशांना केली होती.

क्रूड ऑईलच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीने जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. अन्य आयातदार देशांशी समन्वय राखल्याशिवाय ‘ओपेक’ देशांवर आपण दबाव कसा आणणार? आम्हीही राखीव साठा खुला करणार आहोत.
– हरदीपसिंग पुरी, केंद्रीय पेट्रोलियममंत्री

लिटरमागे 2 ते 3 रुपयांनी कमी होणार इंधन दर; तज्ज्ञांचे मत

केंद्राच्या या निर्णयामुळे इंधनाचे दर लिटरमागे 2 ते 3 रुपयांपर्यंत कमी होतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तथापि आगामी काळात डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला तर मात्र इंधनाचे दर कमी होणे कठीण होऊन बसेल. क्रुड ऑईल सध्या 80 डॉलर प्रती बॅरेल आहे, ते प्रती बॅरेल 70 डॉलरपर्यंत यावेत, असा भारतासह अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान आणि अन्य इंधन आयातदार देशांचा प्रयत्न आहे.

अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यात इंधनपुरवठ्यातील कपात मोठा अडथळा

ओपेक देश आणि रशियासह अन्य क्रूड ऑईल उत्पादक देश मिळून मासिक तत्त्वावर दररोज 4 लाख बॅरेल क्रूड ऑईल बाजाराला पुरवितात. मागणीच्या तुलनेत हा पुरवठा तोकडा असल्याने त्याचा परिणाम दरवाढीवर झालेला आहे. कारण सध्याची मागणी कोरोनापूर्व काळातील मागणीच्या पातळीवर येऊन ठेपली आहे. अर्थव्यवस्थांनी कोरोनापूर्व पातळी गाठायची तर क्रूड ऑईल उत्पादक देशांनी पुरवठ्यात तीन पटीने वाढ हवी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

युरोपातील काही देशांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने 26 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच ब्रेंट क्रूडचा दर 86.40 वरून 78 डॉलर प्रती बॅरेलवर घसरला होता खरा; पण नंतर त्यात वाढच होत गेली. उत्पादन वाढ हाच हे दर आटोक्यात आणण्यासाठीचा एकमेव प्रभावी मार्ग आहे, असे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. आपापला राखीव साठा खुला करण्याचा निर्णय काही देश जाहीर करू लागले तशी त्यात पुन्हा एक डॉलरची वाढ झाली. कू्रड ऑईल दरवाढ ही बाब कोरोना काळात घसरलेली जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यातील सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ बाजारातील दरात विक्रमी वाढ झाली. सरकारवर करकपातीच्या माध्यमातून यंदाच्या वर्षात 60 हजार कोटी रुपयाच्या महसुलावर पाणी सोडण्याची वेळ या इंधन दरवाढीने आणली. चीनही आता राखीव साठा खुला करण्याच्या तयारीत आहे. जपाननेही तसा निर्णय जाहीर केला आहे.

कुठे आहेत राखीव साठे?

  • आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे 1.33 दशलक्ष टन राखीव साठ्याची सोय आहे.
  • कर्नाटकमधील मंगळुरू येथे 1.5 दशलक्ष टन साठ्याची, तर पदूर येथे 2.5 दशलक्ष टन साठ्याची सुविधा आहे.

Back to top button