अयोध्या; वृत्तसंस्था : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर अयोध्येतील राम मंदिरातील गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली. 23 जानेवारीला पहिल्याच दिवशी पाच लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. यामुळे उत्तर प्रदेशच्या उत्पन्नात 4 लाख कोटींची भर पडणार असल्याचे एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाल्यानंतर दुसर्या दिवसापासून मंदिराचे दरवाजे सार्वजनिक करण्यात आले. राम मंदिरामुळे अयोध्या धार्मिक राजधानी म्हणून नावारूपास येत आहे. भाविकांचा ओघ कायम राहणार असल्यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला या मंदिरामुळे बूस्टर मिळणार असल्याचे देश-विदेशातील वित्तीय संस्थांनी म्हटले आहे. एसबीआयच्या संशोधन अहवालातही उत्तर प्रदेशचे उत्पन्न चार लाख कोटींवर जाणार असल्याचे म्हटले?आहे. अयोध्या नगरीतील वाढत्या पर्यटनामुळे 2024-25 या वित्तीय वर्षात उत्तर प्रदेशचे कर संकलन 5 हजार कोटींवर जाणार असल्याचा दावा एसबीआयच्या अहवालात करण्यात आला आहे. राम मंदिरामुळे अयोध्येतील पर्यटनात वृद्धी होणार असल्याने उत्तर प्रदेश 4 लाख कोटींनी श्रीमंत होणार आहे, असेही यामध्ये म्हटले आहे. अयोध्येशिवाय वाराणसी आणि मथुरेतील मंदिरांकडे पर्यटकांचा ओढा यानिमित्ताने वाढण्याची शक्यता आहे. वाहतूक, हॉटेल, साहित्य पुरवठा आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार वृद्धी होण्यास चालणा मिळणार असल्याचेही यामध्ये म्हटले आहे.
अयोध्येला दररोज 1 लाख भाविक भेट देतील आणि नजीकच्या काळात ही संख्या 3 लाखांवर जाईल. प्रत्येक पर्यटकाने अडीच हजार खर्च केल्यावर केवळ अयोध्या नगरीचे उत्पन्न 25 हजार कोटींवर जाईल. उत्तर प्रदेशातील एकूण पर्यटनामुळे या राज्याला वर्षाला 1 लाख कोटींचा महसूल प्राप्त होऊ शकतो. यामध्ये वृद्धी होऊन उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था 4 लाख कोटींवर जाईल, असा अंदाजही वित्तीय संस्थांनी व्यक्त केला आहे.
जेफरिज या विदेशी स्टॉक मार्केट रिसर्च संस्थेने म्हटल्यानुसार, व्हॅटिकन सिटी आणि मक्का येथील पर्यटनापेक्षा अयोध्येतील पर्यटनात सर्वाधिक वाढ होणार आहे. अयोध्येत वर्षाला 5 कोटी पर्यटक भेट देतील. भारतातील अन्य पर्यटनस्थळांपेक्षा अयोध्येतील पर्यटकांची संख्या जादा असेल, असेही या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. भारतातील तिरुपती बालाजीला दरवर्षी 2.5 कोटी भाविक भेट देतात. तिरुपती देवस्थानचे वार्षिक उत्पन्न 12 हजार कोटी आहे. वैष्णोदेवीला प्रत्येक वर्षी 80 लाख भाविक भेट देतात. या मंदिराला वर्षाला 5 हजार कोटींचे उत्पन्न मिळते. ताजमहलला 70 लाख भाविक दरवर्षी येतात. त्यातून 100 कोटी उत्पन्न प्राप्त होते. आग्रा किल्ल्याला वर्षाला 30 लाख पर्यटक येत असून, 27.5 कोटी उत्पन्न मिळत आहे.
स्वित्झर्लंड, इटली, फ्रान्स, अमेरिका, दुबई आदी ठिकाणच्या पर्यटनात घट झाली आहे. अयोध्येतील राम मंदिरामुळे या देशांपेक्षा भारतातील पर्यटनात वाढ होणार असल्याचेही यामध्ये म्हटले आहे.