पुढारी ऑनलाईन डेस्क : अखेर ती वेळ आली आहे… ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज भगवान श्री राम त्यांच्या भव्य आणि दिव्य मंदिरात निवास करणार आहेत. श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक विधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल झाले आहेत. महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते पोचले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अभिजित मुहूर्तावर दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी सुरू होईल. रामलल्लांच्या डोळ्यावरील पट्टी काढली जाईल. रामलल्लांच्या डोळ्यांत सुवर्णदंडिकेने पंतप्रधान काजळ लावतील. रामलल्लाला आरसा दाखवतील. अयोध्या या 'न भूतो न भविष्यती' सोहळ्यासाठी सज्ज झाली असून, आज शहरात ११ लाख दिवे चेतविले जाणार आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले आहेत. शहर अडीच हजार क्विंटल फुलांनी सजविण्यात आले आहे. सर्वत्र सुरक्षा व्यवस्था चोख आहे. अयोध्येत तब्बल २५ हजारांवर जवान तैनात आहेत.