पुढारी ऑनलाईन डेस्क: अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. २२ जानेवारी रोजी रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशातील संपूर्ण वातावरण राममय झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज ( दि. १८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम जन्मभूमी मंदिर स्मरणार्थ टपाल तिकिटे जारी करण्यात आली. जगभरातील प्रभू राम यांच्यावर जारी केलेल्या तिकिटांच्या पुस्तकाचे देखील यावेळी प्रकाशन करण्यात आले. (PM Modi Issued Postal Stamps)
पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेल्या टपाल तिकिटांमध्ये ६ तिकीटांचा समावेश आहे. यामध्ये राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायू, केवलराज आणि मा शबरी इ. आहेत. तसेच पोस्ट तिकिटावर चौपई 'मंगल भवन अमंगल हरी', सूर्य, सरयू नदी आणि मंदिराच्या आसपासची शिल्पे यांचा देखील समावेश आहे, असे देखील एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (PM Modi Issued Postal Stamps)
तसेच जगभरातील प्रभू राम यांच्यावर जारी केलेल्या स्टॅम्प बुक प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रभू रामाचे आंतरराष्ट्रीय आवाहन प्रदर्शित करण्याचा हा एक प्रयत्न आहे. जगभरातील प्रभू राम यांच्यावर जारी केलेल्या तिकिटांच्या ४८ पानी पुस्तकात यूएस, न्यूझीलंड, सिंगापूर, कॅनडा, कंबोडिया आणि UN सारख्या 20 हून अधिक देश आणि संस्थांनी जारी केलेली तिकिटे समाविष्ट आहेत, असेही वृत्तात म्हटले आहे. (PM Modi Issued Postal Stamps)
यावेळी मोदी म्हणाले, की आज श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा अभियानाशी संबंधित आणखी एका अद्भुत कार्यक्रमाशी जोडले जाण्याचे सौभाग्य लाभले आहे. आज श्री रामजन्मभूमी मंदिराला समर्पित सहा विशेष टपाल तिकिटे जारी करण्यात आली आहेत. विविध देशांमध्ये भगवान श्री राम यांच्याशी संबंधित टपाल तिकिटांचा अल्बम देखील आज प्रसिद्ध झाला आहे. टपाल तिकिटे लिफाफ्याला चिकटवून आपला महत्त्वाचा संदेश किंवा कागदपत्रे अन्यत्र पाठविता येतात. परंतु टपाल तिकिटे आणखी एक महत्त्वाची भूमिका बजावतात. टपाल तिकिटे म्हणजे हे कल्पना, इतिहास आणि ऐतिहासिक प्रसंग पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.
एखाद्या टपाल तिकिटाचे प्रकाशन होते आणि ते प्रवास करून पोहोचते तेव्हा ते इतिहासाचा एक हिस्सा लोकांपर्यंत पोहोचवते. हे तिकीट म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नसून ते इतिहासाची पुस्तके, कलाकृती आणि ऐतिहासिक स्थळांचे सर्वात लहान स्वरूप देखील आहेत. आज जारी करण्यात आलेल्या या टपाल तिकिटांमधून तरुण पिढीलाही खूप काही शिकायला मिळेल. या टपाल तिकिटांवर मंदिराच्या अंतर्गत वास्तुकलेचे सौंदर्य अतिशय तपशीलवार छापण्यात आले आहे. या कामात टपाल विभागाला रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट तसेच संतांचे मार्गदर्शन लाभले आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले.
मोदी म्हणाले, की भगवान श्रीराम, माता सीता आणि रामायण यांच्या कथा काळ, समाज, जात, धर्म, प्रदेश यांच्या सीमा ओलांडून प्रत्येक व्यक्तीशी जोडलेल्या आहेत. अत्यंत कठीण काळातही त्याग, एकता आणि धैर्य दाखवणारे रामायण, अनेक संकटातही प्रेमाचा विजय शिकवणारे रामायण संपूर्ण मानवतेला स्वतःशी जोडते. यामुळेच रामायण जगभर आकर्षणाचे केंद्र बनले आहे.