अमित शहा : त्रिपूरा हिंसाचार प्रकरणात लक्ष घालू; तृणमुल काँग्रेसला आश्वासन | पुढारी

अमित शहा : त्रिपूरा हिंसाचार प्रकरणात लक्ष घालू; तृणमुल काँग्रेसला आश्वासन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांवर अन्याय सुरू असल्याचा दावा करत, या पक्षाच्या खासदारांनी सोमवारी गृह मंत्रालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी शिष्टमंडळाची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी त्रिपुरा हिंसाचार प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याची माहिती खा. कल्याण बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

त्रिपुरा तृणमूल युवक काँग्रेसच्या अध्यक्षा सायोनी घोष यांना रविवारी स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न घोष यांनी केला असल्याचा गंभीर आरोप त्रिपुरा हिंसाचार दरम्यान पोलिसांनी ठेवला होता.

या घडामोडीनंतर तृणमूलच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीला कूच केले होते. सकाळी अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, तथापि त्यावेळी शहा यांनी शिष्टमंडळाला भेट दिली नव्हती. यानंतर तृणमूल खासदारांच्या शिष्टमंडळाने संसदेजवळ असलेल्या गृह मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले. शेवटी गृहमंत्री शहा यांनी खासदारांना बोलावून घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

काही दिवसांपूर्वी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लवकुमार देब हे एका जाहीर सभेला मार्गदर्शन करीत असताना तिथून जात असलेल्या सायोनी घोष यांच्या ताफ्यातील काही लोकांनी सभेतील लोकांवर दगडफेक केली होती. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचे त्रिपुरा पोलिसांचे म्हणणे आहे. गृहमंत्री शहा यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात खा. डेरेक ओ ब्रायन, सुखेंदू रॉय, शंतनु सेन, माला रॉय आदींचा समावेश होता.

हे ही वाचा :

Back to top button