हावेरी; पुढारी वृत्तसेवा : तलावात बुडून मृत्यू झालेल्या दोन मुलांना पुन्हा जिवंत करण्यासाठी गावकर्यांनी त्यांचे मृतदेह चक्क मिठाच्या ढिगार्यात ठेवले. पाच तास त्यांनी ते मृतदेह मिठाच्या ढिगार्यात ठेवले होते. याबाबत पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पालकांची समजूत काढली. त्यानंतर त्या मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दि. 24 रोजी हावेरी जिल्ह्यातील कागीनेलेजवळील एका गावात ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत (वय 12) आणि नागराज (वय 11) हे दोघे गावातील तलावात पोहोण्यासाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. फार वेळ झाला तरी मुले घरी आली नसल्याने कुटुंबियांसह गावकर्यांनी त्यांचा शोध घेतला. यावेळी तलावाच्या काठावर मुलांचे कपडे सापडले. त्यामुळे ग्रामस्थांनी तलावात शोधमोहीम राबविली असता दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. यावेळी काही गावकर्यांनी त्या मुलांच्या पालकांना सांगितले की मृतदेह मिठात ठेवले तर ते पुन्हा जिवंत होऊ शकतात. पालकांनी भाबडी आशा ठेवून त्या मुलाचे मृतदेह मिठाच्या ढिगार्याखाली ठेवले.
सोशल मीडियावर फिरणार्या एका व्हिडीओवर विश्वास ठेवून गावकर्यांनी त्या मुलांचे मृतदेह मिठात ठेवले. पाण्यात बुडालेल्या एका मुलाला बाहेर काढून मिठाच्या ढिगार्याखाली ठेवले जाते. त्यानंतर तो मुलगा जिवंत होतो, असा व्हिडीओ गेल्या सोशल मीडियावर फिरत असून त्याचे अनुकरण या गावकर्यांनी केले.
गावकर्यांनी अनेक घरांमधून मीठ गोळा करून त्या मुलांचे मृतदेह मिठामध्ये ठेवले. आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही पालक आपल्या म्हणण्यावर ठाम होते. आपली मुले पुन्हा जिवंत होतील अशी त्यांना आशा होती. चार, पाच तास समजूत काढल्यानंतर गावकरी व पालकांना आमचे म्हणणे पटले. त्यानंतर त्या मुलांवर अंत्यसंस्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
अशीच एक घटना 2022 मध्ये बळ्ळारी जिल्ह्यात घडली होती. बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह मिठाच्या ढिगार्यात ठेवण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले. सोशल मीडिया फिरणारे अनेक व्हिडीओ जनतेची कशी दिशाभूल करत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही जागरूक राहून खातरजमा करण्याची गरज असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.