नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संसद अधिवेशनादरम्यान तरुणांनी बुधवारी लोकसभेत घुसखोरी करून 'तानाशाही नहीं चलेगी, लोकतंत्र बचाओ, काला कानून खतम करो,' अशा घोषणा देत धुराचे नळकांडे फोडले. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला बुधवारी 22 वर्षे पूर्ण होत असताना, नव्या संसद भवनाच्या सुरक्षेला खिंडार पाडणार्या या घटनाक्रमामुळे सरकारसह सुरक्षा यंत्रणांची एकच तारांबळ उडाली. यामुळे संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेचे दावे फोल ठरले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एक तरुण आणि हरियाणातील एका तरुणीसह पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील एकजण फरारी आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. (Parliament Attack)
याप्रकरणी संसदेच्या सुरक्षा यंत्रणेने आणि दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला असून, सरकारनेसर्वपक्षीय बैठक घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. सर्व संशयितांनी संसदेत प्रवेशासाठी भाजपचे कर्नाटकमधील खासदार प्रताप सिंह यांच्या शिफारशीच्या आधारे प्रेक्षक गॅलरीचा प्रवेश पास मिळवला होता. तसेच या सर्वांची सोशल मीडियावरून एकमेकांशी ओळख झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. (Parliament Attack)
संसदेवर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा 22 वा स्मृती दिन बुधवारी होता. याच दिवशी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्या. लोकसभेमध्ये दुपारी एकच्या सुमारास शून्यकाळ सुरू असताना घुसखोरीचा प्रकार घडला. (Parliament Attack)
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सभागृहात होते. भाजपचे खासदार खगेन मुर्मू आपला विषय मांडत असताना प्रेक्षकांसाठी राखीव असलेल्या चार क्रमांकाच्या गॅलरीतून एका तरुणाने थेट सभागृहात उडी घेतली आणि खासदारांच्या आसनांवरून उड्या मारत अध्यक्षीय आसनाच्या दिशेने धावायला सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वच जण अचंबित झाले होते. पाठोपाठ दुसर्या तरुणानेही उडी घेतल्यानंतर प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी सभागृहाचे कामकाज तत्काळ स्थगित केले.
खासदार हनुमान बेनिवाल यांनी नंतर सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना या घटनाक्रमाचे वर्णन केले. दोन्ही तरुणांनी बुटातून धुराचे नळकांडे काढून फोडले आणि 'तानाशाही नहीं चलेगी, लोकतंत्र बचाओ, काला कानून खतम करो,' अशा घोषणा दिल्या. या तरुणांचे आणखी दोन सहकारी प्रेक्षक गॅलरीत होते. त्यात एका महिलेचाही समावेश होता, असे त्यांनी सांगितले.
हे कृत्य करण्यामागे या सगळ्यांचा नेमका काय हेतू होता, धुराच्या नळकांड्यातील वायू विषारी असता तर काय झाले असते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. अशाच प्रकारचा घटनाक्रम मलूक नागर यांनीही सांगितला. लोकसभेमध्ये हा प्रकार घडण्याच्या आधी संसद भवनाच्या बाहेर, परिवहन मंत्रालयाच्या जवळच्या भागात दोन जणांनी अशाच प्रकारे रंगीत धुराचे नळकांडे फोडून घोषणाबाजी केली. दिल्ली पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यात हरियाणातील नीलम सिंह या तरुणीचा, तर अमोल शिंदे या तरुणाचा समावेश होता. अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे. या दोन्ही घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडाल्याचेही दिसून आले.
बुधवारी दुपारी दोन वाजता सभागृह सुरू झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहातील या घटनेवर चिंता व्यक्त केली. या घटनेची लोकसभेने चौकशी सुरू केली आहे. दिल्ली पोलिसांनाही तपासाबद्दल आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सभागृहात घुसखोरांनी फोडलेल्या नळकांड्यातील धूर हा फारसा हानिकारक नसल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे, असेही बिर्ला यांनी स्पष्ट केले. मात्र, संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेशी निगडित हा संवेदनशील विषय असल्याने त्यावर चर्चा व्हायला हवी, अशी मागणी विरोधी बाकावरील एन. के. प्रेमचंद्रन, टी. आर. बालू, काँग्रेसचे अधीररंजन चौधरी यांनी केली.
संसदेवरील हल्ल्याच्या स्मृतिदिनी हा प्रकार घडल्याने हा विषय चिंताजनक असल्याचे चौधरी यांनी सांगितले. संसदेच्या सुरक्षेमध्ये सुरक्षा रक्षकांची कमतरता असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांनीही संसद भवन परिसरातील प्रेक्षकांची वाढती गर्दी आणि खासदारांसोबत मोबाईलवर सेल्फी घेण्याचा आग्रह हा प्रकार त्रासदायक असल्याचा उल्लेख केला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत राजधानीत या विषयाची जोरदार चर्चा सुरू होती.