शरद पवार : देशात लोकांना आता पर्याय हवा आहे | पुढारी

शरद पवार : देशात लोकांना आता पर्याय हवा आहे

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे पुढे येणार्‍या सांप्रदायिक शक्ती देशाची शांतता भंग करीत आहेत. काही सांप्रदायिक शक्ती त्रिपुरा हिंसाचाराचा फायदा घेऊ पाहत असल्याने सतर्क राहण्याची गरज आहे. लोकांना आता पर्याय हवा आहे आणि तो देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत. यासाठी आधी आम्हाला आमचा पाया मजबूत करायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केले.

दिल्लीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते योगानंद शास्त्री यांनी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी ते बोलत होते. देशात समविचारी पक्षांनी राष्ट्रहितासाठी एकत्र आले पाहिजे. सांप्रदायिक शक्तींना पर्याय देत भाजपला रोखण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु, आमचे घरही आम्हाला मजबूत करावे लागेल. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपात भाजपला पर्याय मिळेल, असेही शरद पवार म्हणाले. पवार म्हणाले की, देशातील विविध राज्यांमध्ये राष्ट्रवादीचे सहकारी पक्षवाढीसाठी प्रयत्नशील आहेत.

परंतु, राजधानी दिल्लीत पक्षाची जी स्थिती असायला पाहिजे तशी नाही. दिल्ली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन नाही. त्यामुळे आम्हाला इथे अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. योगानंद शास्त्री यांच्या पक्षप्रवेशाने दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होण्यास मदत होईल. त्यांनी विधानसभेचे अध्यक्षपद प्रदीर्घ काळ चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे.

एक चांगला अध्यक्ष विधानसभेचे काम कसे चालवू शकतो याचा आदर्श शास्त्रीजींनी देशासमोर घातला आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी या सर्वांचं स्वागत करतो, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.योगानंद शास्त्री यांनी काँग्रेस सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात काम केले आहे.

वानखेडेप्रकरणी केंद्राने लक्ष घालावे

भाजपसोबत वर्षानुवर्षे काम केलेले सहकारी आता आमच्या बाजूला येत आहेत.अधिकारांचा गैरवापर जिथे होत आहे, त्याला एक्सपोज करण्याचे काम नवाब मलिक करीत आहेत, ही त्यांची जबाबदारी आहे. अशात वानखेडे प्रकरणी केंद्राने लक्ष दिले पाहिजेे.

राज्याला पार्टटाइम मुख्यमंत्री नको, या भाजपाच्या वक्तव्यात काही दम नसून, मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री असतो. त्यांना जबाबदारी दिली आहे, जनतेने स्वागत केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर ऑपरेशनचे संकट असूनही त्यांचे काम सुरू आहे, अशा शब्दांत पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

Back to top button