पुढारी ऑनलाीन डेस्क: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मिचौंग चक्रीवादळ आज (दि.५) दुपारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्यास सुरूवात झाली. गेल्या दोन तासांहून लँडफॉलची प्रक्रिया सुरूच आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा फटका तमिळनाडूतील चेन्नई शहराला देखील बसला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे चेन्नईत पूरस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणे इमारती पाण्याखाली बुडाल्या आहेत. झाडे उन्मळून पडली आहेत. चेन्नईत 'या' नैसर्गिक आपत्तीमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. (Cyclone Michaung Update)
मिचौंग चक्रीवादळ आज दुपारी ३ च्या सुमारास दक्षिण आंध्रप्रदेशची किनारपट्टी बापतला येथे धडकण्यास सुरूवात झाली. त्यानंतर आंध्रमधील बापतला शहराच्या किनारपट्टीलगत समुद्र खवळलेला असून, जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान पुढील काही तासांत हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून ते कमकुवत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. (Cyclone Michaung Update)
आंध्र प्रदेशातील सर्व बाधित जिल्ह्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. अमरावती हवामान केंद्राच्या अधिका-याने सांगितले की, तीव्र चक्रीवादळ मिचौंगने आज दुपारी 12.30 ते 2.30 दरम्यान बापतला जिल्ह्याच्या जवळ दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकण्यास सुरूवात केली आहेत. त्यानंतर किनारपट्टीवर प्रचंड पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय नागरिकांना मदत मिळण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने प्रभावित जिल्ह्यांमध्ये हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. तिरूपतीमध्ये अडकलेल्यांना मदतीसाठी तिरुपती (0877 – 2236007) हा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
IMD ने आंध्रप्रदेशातील सागरी किनारपट्टीच्या भागात पूराचा इशारा दिला आहे. उद्या सकाळी ११.३० पर्यंत किनारी भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील जिल्ह्यांचा देखील समावेश आहे.
आंध्रप्रदेश- गुंटूर, प्रकाशम आणि कृष्णा
आंध्रप्रदेश- पश्चिम गोदावरी, गुंटूर, कुरनूल, प्रकाशम आणि नेल्लोर
तेलंगणा- नलगोंडा, सूर्यपेट, खम्मम, भराद्री कोथागुडेम आणि महबूबाबाद