पुढारी ऑनलाईन डेस्क: बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ 'मिचौंग' हे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर बापतलाजवळ धडकण्यास सुरूवात झाली आहे. पुढील दोन तास लँडफॉलची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. परिणामी आंध्र प्रदेशातील बापतला येथे मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. किनारपट्टीलगत 90-100 ते 110 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असून, किनारपट्टी आणि किनारपट्टीलगत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे, असे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Cyclone Michaung Update)
आंध्र प्रदेशातील बापतला येथे समुद्र खवळला असून, समुद्राच्या लाटा उसळल्या आहेत. दरम्यान, मिचौंग चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या बापतला येथे भरतीच्या लाटा धडकत आहेत. (Cyclone Michaung Update)
'मिचौंग' चक्रीवादळ गेल्या ६ तासांपासून १० किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. आज ५ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता ते आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या केंद्रस्थानी आहे. ते सध्या दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टीवर केंद्रित झाले असून, आंध्रच्या किनारपट्टीला धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील दोन तासांत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रतितास ९० ते १०० किमी प्रतितास वाऱ्याचा वेग राहणार असून, या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. (Cyclone Michaung Update)